Maharashtra Budget : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:59 PM2023-03-09T15:59:04+5:302023-03-09T17:06:10+5:30
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार!
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा 1.50 लाखांहून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra budget 2023) ही घोषणा करण्यात आली. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहे. यामध्येमहात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहेत. याशिवाय, नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.40 लाखांहून 4 लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात 700 दवाखाने उघडण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार असून प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान केले जाणार आहे, असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना?
राज्यातील दारिद्ररेषेखालील विशेषकरुन पिवळी शिधापत्रिका धारकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने 2 जूलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी जनारोग्य सुरु केली. पुढे 21 नोव्हेंबर 2013 ला राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे 'महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना' (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका, अत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना तसेच केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.