Maharashtra Budget Session: राज्यपालांच्या वक्तव्याचा विरोध, विधानभवनाच्या पायरीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचे शीर्षासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 02:41 PM2022-03-03T14:41:53+5:302022-03-03T14:44:04+5:30
Maharashtra Budget Session: आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
मुंबई: आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला(Maharashtra Budget Session 2022) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ झाला. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच, सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
राज्यपालांचा वेगळ्या मार्गाने निषेध
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केल्यानंतर सभागृहाच्याबाहेर विधानभवनाच्या आवारामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, राज्यपालांचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने चक्क शीर्षासनही केले.
संजय दौंद यांचे शीर्षासन
राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यात सोडून राजभवनाकडे रवाना झाले. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करत राज्यपालांचा निषेध केला.
कोण आहेत संजय दौंड?
संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र असून पंडितराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.
राज्यपालांच्या वक्त्वाचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सभागृहाबाहेर ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव’च्या घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या.