Maharashtra Budget Session 2022: अभूतपूर्व! अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण; राज्यपाल आले अन् गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:51 AM2022-03-04T05:51:34+5:302022-03-04T05:52:42+5:30
Maharashtra Budget Session 2022: विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी घडला. त्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. सकाळी ११ वाजता राज्यपालांचे संयुक्त सभागृहात दोन्ही सदनांच्या सदस्यांना संबोधित करण्यासाठी आगमन झाले. वंदे मातरम् झाल्यानंतर राज्यपालांनी अभिभाषण वाचनाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या उल्लेखाने सुरुवात केली. त्यावेळी प्रथम सत्ताधारी बाजूने ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदस्यांना हाताने इशारा करीत शांत केले. या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देत विरोधकांनी ‘दहशतवाद्यांचे हस्तक असलेल्या सरकारचा निषेध असो’, ‘दाऊदच्या हस्तकांचे राजीनामे घ्या’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. फलक फडकाविले. घोषणाबाजीनंतर राज्यपाल आपल्या भाषणाचा एकदम शेवटचा परिच्छेद वाचत सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य अवाक् झाले.
कशामुळे, कसे घडले?
राज्यपाल कोश्यारी यांनी ‘समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते व गुरुशिवाय शिष्याचे महत्त्व नसते’ अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यपाल अभिभाषणासाठी येताच महाविकास आघाडीच्या सदस्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.
भाजपच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडले
राज्यपालांनी राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजे. राष्ट्रगीत हा कार्यक्रमाचाच भाग असतो. सुरुवातीला जसे राष्ट्रगीत असते, तसेच राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपतो; पण या सर्व गोष्टींचे भान न ठेवता ते त्वरित पायउतार झाले. या सगळ्याची जबाबदारी भाजपवर टाकावी लागेल; कारण भाजपच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडले. राष्ट्रगीताचा अवमान करणे अपेक्षित नव्हते. जयंत पाटील, जलसंपदामंत्री
सदस्यांच्या भावना तीव्र होत्या
राज्यपाल कोश्यारी सरकारच्या वतीने भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्या वतीने भाषण करीत आहात; पण तेच सरकार दाऊदला शरण होत असेल तर हे भाषण कशाला ऐकायचे, हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करीत होते की, नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा