Maharashtra Budget Session:”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून...”; विधानसभेत आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:47 PM2022-03-16T13:47:55+5:302022-03-16T13:48:46+5:30
इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका. राजकारणाचे मुद्दे बरेच आहेत. आमदारांच्या हक्काचं संरक्षण करावं असं शेलारांनी सांगितले.
मुंबई – नाशिक जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रस्तावामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं छापण्यात आली आहे. भाजपा आमदारांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे. मी भाजपा आमदार म्हणून प्रस्ताव मांडला असताना खासदारांचे नाव समाविष्ट करण्यात येते. हा आमच्या लोकप्रतिनिधीच्या हक्कांवर गदा नाही का? आम्हाला संरक्षण द्यावं असं नाशिकच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मागणी केली. त्यावरून भाजपा-शिवसेना सभागृहात आमनेसामने आल्याचं पाहायला मिळाले.
यावर भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, भाजपा आमदार देवयानी फरांदे त्यांच्या अधिकारावर बोलल्या. मी स्वत: त्याठिकाणी गेलो होतो. भाजपा आमदारांच्या निधीतून विकासकामं होत असताना श्रेय दुसऱ्या पक्षातील नेत्यांना कसे मिळते? राष्ट्रवादी आमदारांच्या प्रस्तावावर युवासेनेच्या अध्यक्षाचे नाव.. भाजपा आमदारांच्या प्रस्तावावर शिवसेनेच्या खासदारांचे नाव कसे येते? असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष, त्याचे स्वागत आहे, पण भाजपा आमदारांनी केलेल्या विकास योजनांवर शिवसेना नेत्यांची नावं कशी येतात? इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका. राजकारणाचे मुद्दे बरेच आहेत. आमदारांच्या हक्काचं संरक्षण करावं असं त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकरणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही हा राजकारणाचा मुद्दा नाही. तर प्रशासकीय कामाचा मुद्दा आहे. प्रशासकीय यंत्रणेत जेव्हा एखादा सरकारी कागद लोकांपर्यंत पोहचवतो त्यावर लोकप्रतिनिधींची नावं टाकता येतात. आपण लोकशाहीत राहतो. दुसऱ्या आमदाराने केलेल्या कामाचे श्रेय घेणे हे चुकीचे आहे. शासकीय कागद कुणाच्या नावाने काढला जात नाही. परंतु जर शासकीय कागद काढायचा असेल तर त्यात लोकप्रतिनिधीचं नाव यायला पाहिजे. हीच परंपरा पडेल. शासकीय आदेशात पक्षातील लोकांची नावं टाकली जातील. आपण नव्या प्रथेला जन्म देणार का? ही प्रथा अतिशय चुकीची होईल. ही प्रथा पुढे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं त्यांनी म्हटलं. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सजेशन फॉर एक्शन असं सांगत त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. यावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला परंतु कामकाज पुढे सुरूच राहिले.