Maharashtra Cabinet Expansion: १९ जणांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:30 AM2019-12-31T03:30:17+5:302019-12-31T06:45:31+5:30
आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे आणि संजय बनसोडे यांना लॉटरी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला असून तब्बल १९ जणांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे आणि संजय बनसोडे यांची तर लॉटरीच लागली आहे. कारण हे चारही जण पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले असून थेट मंत्री बनले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार करण्यात आला. तब्बल ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अनुभवी आणि नवख्या चेहऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला असला तरी ते पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. यापूर्वी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हेही पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. विदर्भातील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या काँग्रेस नेत्यांचा देखील पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. तिसºयांदा आमदार झालेले बच्चू कडू यांनाही पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे.
बाळासाहेब पाटील, अनिल परब, शंभुराज देसाई, उदय सामंत, संदीपान भुुमरे, शंकरराव गडाख, के. सी. पडवी, अस्लम शेख, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.