Eknath Shinde Cabinet Expansion LIVE: राठोडांना पोलिसांनी क्लिनचीट दिली, त्यामुळेच त्यांना मंत्रिपद - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 09:13 AM2022-08-09T09:13:58+5:302022-08-09T09:17:39+5:30

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

Maharashtra cabinet expansion assembly session cm eknath shinde dcm devendra fadnavis bhagat singh koshyari mantralaya live article | Eknath Shinde Cabinet Expansion LIVE: राठोडांना पोलिसांनी क्लिनचीट दिली, त्यामुळेच त्यांना मंत्रिपद - मुख्यमंत्री

Eknath Shinde Cabinet Expansion LIVE: राठोडांना पोलिसांनी क्लिनचीट दिली, त्यामुळेच त्यांना मंत्रिपद - मुख्यमंत्री

googlenewsNext

राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचे सर्व अपडेट्स असे... 

>> भंडारा जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. राज्यातली निम्मी लोकसंख्या-कोट्यवधी मुलीमहिला असुरक्षित आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आमदारांमध्ये 'महिला व बाल विकास मंत्री' म्हणून एकही महिला नेतृत्व मुख्यमंत्री महोदयांना सक्षम वाटलं नाही का? - शालिनी ठाकरे



>> आमची भूमिका सर्वसमावेशक आहे. पुढे मत्रिमंडळ विस्तार होणार. आम्ही काम करून उत्तर देणार. सरकार लोकाभिमूख आहे - मुख्यमंत्री

>> महाविकास आघाडी सरकारमध्ये राठोड यांना क्लिनचीट दिली होती. म्हणून त्यांचा समावेश मंत्रिमंडळात. पोलिसांच्या तपासात सगळं समोर आलं आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल - मुख्यमंत्री

>> उशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही. त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं - अजित पवार

>> मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. १९९५ पासून ते सहा वेळा आमदार राहिले आहे. ते प्रख्यात बिल्डर म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

>> संभूराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यापूर्वीच्या सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्रीपदाची, राज्य उत्पादन शुक्ल राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती. पाटण मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

>> अतुल सावे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यापूर्वी त्यांनी उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य ही पदं भूषवली होती. 

>> शिंदे गटाची प्रवक्तेपदाची भूमिका पार पाडत असलेल्या दीपक केसरकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. २००९ पासून ते सलग तीन वेळा आमदार आहेत. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.

>> कालपासून चर्चेत असलेल्या अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. ठाकरेे सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. ते सिल्लोडमधून निवडून आले आहेत.

>> भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. ते २००९ पासून आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी बंदरे, माहित व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री अशी जबाबदारी पार पाडली आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. 

>> प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी जलसंधारण मंत्री म्हणून भूमिका बजावली. परंतु यांपूर्वीच्या सरकारमध्ये त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती.

>> उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. २००४ पासून ते आमदार आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली. त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रिपद भूषवलं आहे.

>> संदीपान भुमरे यांनी आज घेतली मंत्रिपदाची शपथ. १९९५ पासून सलग ते पाच वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी यापूर्वी रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 

>> सांगलीच्या मिरजेतील मोठं नाव. सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

>> संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यापूर्वी त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावं लागला होता. एका प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते. भाजपच्याच आरोपांमुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.

>> दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. ते मालेगावचे आमदार आहेत. पहिल्यापासून एकनाथ शिंदेेंचे समर्थन अशी ओळख. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्रीपद भूषवलं होतं. २००४ पासून ते आमदार राहिले आहेत.

>> शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गेल्या सरकारमध्ये स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री होते. ते जळगावचे आमदार आहेत.

>> गिरीश महाजन यांनी घेतली मंत्रिपदाची शपख. यापूर्वी युती सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 

>> आज शपथ घेणाऱ्या सर्वांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती.

>> विजयकुमार गावित यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गावितांचं राज्यपालांकडून मराठीत अभिनंदन. 

>> भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.



>> मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार.. भाजप नेते मुंनगंटीवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. आतापर्यंत दोन आमदारांनी घेतली शपथ. राज्यपालांनी केलं अभिनंदन.

>> शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी सुरू; राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला श्रीगणेशा. राज्यपालांनी दिली गोपनीयतेची शपथ. राधाकृष्ण विखे झाले सहाव्यांदा मंत्री.

>> भाजप-सेनेची युती असल्यानं मंत्रिमंडळ विस्तार होताना अनेकांना समावून घ्यायचं असतं. प्राधान्य होतं ते देण्यात आलं आहे. सर्वांना शिंदेंनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यातही अनेकांचा समावेश होणार आहे. शिंदेंनी त्यांची भूमिका सांगितली आणि आमदारांची भूमिका समजून घेतली. नाराजीचं काहीही कारण नाही - संजय शिरसाट

>> सह्याद्री अतिथिगृहात सुरू असलेली शिंदे गटाची बैठक संपली. खडाजंगी झाली अशी चर्चा असलेले संजय शिरसाटही शिंदेंसोबत.


>> विरोधी पक्षनेते अजित पवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे राजभवनात हजर झाले आहेत.

>>  शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
राजभवनातील खुर्च्यांवर नावे लागली; संजय राठोड, अब्दुल सत्तारांसह १८ जण घेणार मंत्रिपदाची शपथ

>> आम्हाला वेगानं काम करायचं आहे. तसंच बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली.

>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा राजभवानाच्या दिशेने रवाना. शपथविधी सोहळ्यासाठी रावसाहेब दानवे, कपिल पाटील, रामदास आठवले हे उपस्थित.

>> शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ आमदार आज घेणार मंत्रिपदाची थपथ.


>> मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्का आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे. - बच्चू कडू

>> केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. राज्यात मागे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. येत्या काळात आम्ही पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू. चांगली कामगिरी करू - राधाकृष्ण विखे पाटील

>> मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कोणाला स्थान दिलं जाईल हे ठरणार आहे. मी मुख्यमंत्र्यांन भेटण्यासाठी आलो आहे. भेट घेतल्यानंतर कोणाची नावं आहेत हे सांगेन - उदय सामंत

>> मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित केली जातील

>> राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे.  राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

Web Title: Maharashtra cabinet expansion assembly session cm eknath shinde dcm devendra fadnavis bhagat singh koshyari mantralaya live article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.