Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?; वाचा संभाव्य यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:43 AM2022-08-04T10:43:48+5:302022-08-04T10:44:37+5:30
६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे.
मुंबई - गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनात तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात भाजपा-शिंदे गट यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यात भाजपाचे ११६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रिपद सोडून बंडात सहभागी होणाऱ्या नेत्यांना मंत्री बनवावेच लागणार आहे. त्याचसोबत प्रादेशिक समतोल साधणे नव्या सरकारसमोर आव्हान आहे. शुक्रवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल अशी चर्चा आहे. त्यात भाजपाकडून ८ आणि शिंदे गटाचे ७ असे एकूण १५ जण मंत्रिपदाची शपथ घेतील. शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेऊनही महिना उलटला तरी मंत्रिमंडळ रखडल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले होते. नेमका मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे. त्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सूतोवाच दीपक केसरकर यांनीही दिले. त्यात आज सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत काही ठोस निर्णय येण्याचीही शक्यता आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून आज पुन्हा सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आज आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचाही मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना कुणाची असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय घडतं? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
भाजपाकडून ही नावे चर्चेत
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे
शिंदे गटाकडून ही नावे चर्चेत
गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, अब्दुल सत्तार