शिंदे गटातील आमदारांची नाराजी; मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्यानं अपेक्षाभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 10:46 AM2022-08-09T10:46:39+5:302022-08-09T10:47:04+5:30
३० जून रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते.
मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर जवळपास ५० आमदारांनी त्यांना साथ देत मविआविरोधात भूमिका घेतली. ५० आमदारांमुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. बहुमतचाचणी आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रात भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीसांना शपथ घ्यावी लागली.
३० जून रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. अखेर ९ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडत आहे. या विस्तारात भाजपाकडून ९ आणि शिंदे गटाकडून ९ जणांना संधी देण्यात आली आहे. परंतु शिंदे गटात मंत्रिपदाची अपेक्षा असणाऱ्या जास्त संख्या असल्याने पहिल्या टप्प्यात विस्तारात संधी न मिळाल्यानं अनेकजण नाराज आहेत.
बच्चू कडू नाराज
भाजपा-शिवसेनेसोबत सरकारमध्ये अपक्ष, मित्रपक्षांनीही साथ दिली. मात्र पहिल्या विस्तारात अपक्षांना संधी देण्यात आली नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. दिव्यांग कल्याण मंत्रालय, रोजगार हमी विभाग यासाठी आम्ही आग्रही आहोत. मंत्रिपदाचा आमचा हक्क, अधिकार आहे ते आम्ही मिळवू. सामान्य माणसांचे विषय मार्गी लागावेत याला प्राधान्य आहे. मित्रपक्ष, अपक्षांशिवाय सरकार राहू शकत नाही. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते. आम्हाला शब्द दिला आहे. आता काही पावलं मागे घेतली आहे. शब्दाला ठाम राहावं असं कडू यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगावले, बच्चू कडू यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.
कुणाला मंत्रिपदाची संधी?
शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.