मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:23 PM2022-08-08T13:23:21+5:302022-08-08T18:37:57+5:30

Maharashtra Cabinet Expansion: ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आले. यात अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Expansion: Eknath Shinde- Devendra Fadnavis government cabinet will take oath today? | मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी

Next

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. मागील महिनाभरापासून रखडलेला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी सकाळी ११ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर वेगाने चक्रे फिरत आहेत. मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या सकाळी होणार असल्याचं सांगितले गेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडेल.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी पोहचले आहेत. याठिकाणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात विस्ताराबाबत बैठक झाली. साधारणपणे दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं सांगण्यात येते. मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी ११ वाजता किंवा आज रात्री शपथविधी उरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेतली. शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ५० आमदार मविआतून बाहेर पडले. त्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. 

३० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आले. यात अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र एक महिना झाला तरी विस्तार होत नसल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तार कधी असा सवाल सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात येत होते. 

एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याबाबत ८ ऑगस्टला होणारी सुनावणी १२ ऑगस्टला ढकलण्यात आली. सुप्रीम कोर्टात निकाल लागत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्टाची सुनावणी याचा काहीही संबंध नाही. विस्तार करू नये असं कुठेही कोर्टाने म्हटलं नाही असं सांगत मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले होते. 
 

Web Title: Maharashtra Cabinet Expansion: Eknath Shinde- Devendra Fadnavis government cabinet will take oath today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.