"मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव होतं, ऐनवेळी का कापलं हे विचारू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 05:37 PM2022-08-12T17:37:22+5:302022-08-12T17:37:51+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. या यादीत माझं नाव होतं पण काही कारणं असतील. दुसऱ्या विस्तारात मी असेन असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.
औरंगाबाद - मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यात ज्यांनी पहिल्यांदा उठावात साथ दिली त्यांना मंत्री बनवले आहेत. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही पहिल्या यादीत माझं नाव होतं पण ऐनवेळी का कापलं मी विचारू त्यांना विचारू शकत नाही. शिंदे सरकारमध्ये मी मंत्रिमंडळात राहणार आहे असा विश्वास शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. या यादीत माझं नाव होतं पण काही कारणं असतील. दुसऱ्या विस्तारात मी असेन. मी मंत्रिपदावर दिसेन. कुठेही टेन्शन नाही. मी मंत्रिमंडळात राहणार आहे असंही त्यांनी म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यात प्रामुख्याने आमदार संजय शिरसाट यांच्या नावाचा समावेश होता. मात्र मी नाराज नाही असा खुलासा शिरसाट यांनी केला होता.
मराठवाड्यातून चौघांनाच मंत्रीपदाची लॉटरी
राज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन प्रतिनिधित्व मिळाले असून उर्वरित सहा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार पुढील विस्तारात संधी मिळेल या आशेवर आहेत. या प्रदेशात भाजपाचे सोळा तर शिंदे समर्थक आमदारांची संख्या दहा आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि तानाजी सावंत या चौघांची वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर दुसरीकडे भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
‘मविआ’त होते सात मंत्री
महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय बनसोडे असे सात जण मंत्री होते. मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी लागली आहे. शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून सावे यांची वर्णी लागली असण्याची शक्यता आहे.