भाजपचा दिग्गजांना धक्का! फडणवीसांकडे गृह तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांना मिळाली अनपेक्षित खाती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 06:36 AM2022-08-15T06:36:39+5:302022-08-15T06:37:53+5:30

Maharashtra Cabinet portfolios : चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते.

Maharashtra Cabinet ministers allotted portfolios, Devendra Fadnavis had a home ministry | भाजपचा दिग्गजांना धक्का! फडणवीसांकडे गृह तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांना मिळाली अनपेक्षित खाती

भाजपचा दिग्गजांना धक्का! फडणवीसांकडे गृह तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवारांना मिळाली अनपेक्षित खाती

Next

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या दिग्गज भाजप नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. काहींना अनपेक्षितपणे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. महत्त्वाच्या खात्यांवरून भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये धाकधूक असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात दिले होते. जाहीर झालेल्या खातेवाटपात त्याचा प्रत्यय आला.  
फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवार यांच्याकडे वित्त व नियोजन तसेच वन अशी खाती होती. आता त्यांच्याकडे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती आली. चंद्रकांत पाटील यांना महसूल, गृह किंवा सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती मिळतील, असे मानले जात असताना त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व सांसदीय कार्य अशी खाती आली आहेत. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही अत्यंत महत्त्वाची खाती होती. 
राधाकृष्ण विखे-पाटील यांना सर्वात महत्त्वाच्या खात्यांपैकी एक मानले जाणारे महसूल खाते देण्यात आले आहे. या खात्याचे दावेदार म्हणून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्याकडे बघितले जात होते.  
दिग्गजांना धक्के बसले. पण, त्यातून गिरीश महाजन बचावले. त्यांना ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते मिळाले. सोबतच वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण ही आणखी दोन खाती मिळाली असली तरी विस्तारात ती त्यांच्याकडून निघतील आणि त्यांच्याकडे केवळ ग्रामविकास खाते ठेवले जाईल, असे समजते.विजयकुमार गावित यांना शेवटी आदिवासी विकास खाते मिळाले. पण, अनुसूचित जातीचे असलेले सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय खाते मिळाले नाही. त्यांना कामगारमंत्री करण्यात आले. खाडे हे फडणवीस सरकारमध्ये शेवटचे चार महिने सामाजिक न्याय मंत्री होते.

खातेवाटप...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे : बंदरे व खनिकर्म
संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन
संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत : उद्योग
प्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
अब्दुल सत्तार : कृषी
दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा
शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.
राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास
गिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
सुरेश खाडे : कामगार
रवींद्र  चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण
अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

Web Title: Maharashtra Cabinet ministers allotted portfolios, Devendra Fadnavis had a home ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.