शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या पदरी निराशाच, महत्त्वाची खाती भाजपकडेच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 06:20 AM2022-08-15T06:20:21+5:302022-08-15T06:51:57+5:30

Maharashtra Cabinet portfolios :  उद्योग, कृषी, आरोग्य ही तीन महत्त्वाची खाती सोडली तर एकही महत्त्वाचे खाते शिंदे गटाकडे आलेले नाही. ही तीन खाती वगळता इतर कमी महत्त्वाची खाती मंत्र्यांना मिळाली.

Maharashtra Cabinet ministers allotted portfolios, Disappointment on the part of some ministers of the Shinde group | शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या पदरी निराशाच, महत्त्वाची खाती भाजपकडेच

शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या पदरी निराशाच, महत्त्वाची खाती भाजपकडेच

googlenewsNext

मुंबई : शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या  पदरी निराशा आली असल्याचे खाते वाटपावरून दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ खात्यांचा पदभार आहे. यातील नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प) अर्थात एमएसआरडीसी ही खाती शिंदे यांच्याकडे यापूर्वीही होती. ३ खात्यांव्यतिरिक्त एकही विशेष महत्त्वाचे खाते शिंदे यांच्याकडे नाही. 

 उद्योग, कृषी, आरोग्य ही तीन महत्त्वाची खाती सोडली तर एकही महत्त्वाचे खाते शिंदे गटाकडे आलेले नाही. ही तीन खाती वगळता इतर कमी महत्त्वाची खाती मंत्र्यांना मिळाली. उद्योग खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. हे खाते उदय सामंत यांना मिळाले. मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते होते. ठाकरे मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेले पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते त्यांच्याकडे कायम आहे.

मागील मंत्रिमंडळात कृषीमंत्री असलेले दादा भुसे यांच्याकडे बंदरे व खनिकर्म हे अत्यंत कमी महत्त्वाचे खाते आले आहे. अनेकदा हे खाते एखाद्या महत्त्वाच्या खात्याबरोबर दिले जाते. कृषी विभागात अडीच वर्षात भुसे यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा होती. ते आता अब्दुल सत्तार यांना दिले आहे. वादग्रस्त मंत्री संजय राठोड ठाकरे मंत्रिमंडळात वनमंत्री होते. त्यांना आता अन्न व औषध प्रशासन हे खाते देण्यात आले आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे यापूर्वीचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन हे खाते कायम ठेवले.

ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्री केल्यानंतरही त्यांच्याकडे आधीचेच कमी महत्त्वाचे राज्य उत्पादन शुल्क खाते दिले. फडणवीस सरकारमध्ये जलसंधारणमंत्री असलेले प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण हे खाते दिले आहे. ठाकरे सरकारमध्ये राजेश टोपे यांच्याकडे याची धुरा होती. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर हे फडणवीस सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. आता त्यांच्याकडे शालेय शिक्षण व  मराठी भाषा विभाग आला आहे.

खातेवाटप...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे : बंदरे व खनिकर्म
संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन
संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत : उद्योग
प्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
अब्दुल सत्तार : कृषी
दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा
शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.
राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास
गिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
सुरेश खाडे : कामगार
रवींद्र  चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण
अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

Web Title: Maharashtra Cabinet ministers allotted portfolios, Disappointment on the part of some ministers of the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.