कोरोनाच्या चाचण्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:05 PM2020-03-31T18:05:03+5:302020-03-31T18:07:13+5:30

कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

Maharashtra can do 5500 test per day; information by Rajesh tope | कोरोनाच्या चाचण्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; दिवसाला होऊ शकतात ५५०० चाचण्या

Next

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. राज्यात आतापर्यंत ६३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.


कोरानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे. 
सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 


राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून  कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी संगितले. 


राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या एन ९५ मास्क दीड लाख एवढे उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई कीटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजुनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.


राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून राज्यात या योजनेमध्ये सुमारे एक हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.

Web Title: Maharashtra can do 5500 test per day; information by Rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.