आज पोलिसांनी दाखवलेली हतबलता महाराष्ट्राला परवडणारी नाही; उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:43 PM2023-11-11T20:43:50+5:302023-11-11T20:44:25+5:30
पोलीस, महापालिकेला सांगतो, एकतर तुम्ही कारवाई करा अन्यथा बाजूला व्हा, आम्ही बघतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
ठाणे – महाराष्ट्रातलं खरे चित्र देशाला दिसली, पोलिसांची हतबलतासुद्धा महाराष्ट्राने पाहिली. पण सरकार म्हणून जो कारभार सुरू आहे, याच सरकारने पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करायला लावला, याच पोलिसांना जालना इथं मराठा आंदोलकांवर पाशवी लाठीहल्ला करायला सांगितला आणि याच पोलिसांना आज चोरांचे रक्षण करायला सांगितले. मी पोलिसांची मानसिकता समजू शकतो. अशी नामुष्की याआधी पोलिसांवर महाराष्ट्रात कधी आली नव्हती असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंब्रा येथील शाखेला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, मी आज यासाठी आलो जेणेकरून सत्तेचा माज सरकारला आलाय, हे नेभळट आहे, गद्दार, चोर आणि नामर्द आहेत. कारण यांना सत्तेचा आधार घेऊन अत्याचार करतायेत. गेल्या २०-२५ वर्षापासून तिथे असणारी शिवसेनेची शाखा बुलडोझरने पाडली आणि खोके सरकारनं तिथे डबडं आणून ठेवलेले आहे. हे डबडं आम्ही जागेवर ठेऊ देणार नाही. दिवसाढवळ्या घुसखोरी करायला लागले, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे. आमच्याकडे सर्व कर भरलेल्या पावत्या आहेत. उद्यापासून तिथेच शिवसेना शाखा भरेल, शिवसेना एकच आहे आणि ती आमची आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पोलीस, महापालिकेला सांगतो, एकतर तुम्ही कारवाई करा अन्यथा बाजूला व्हा, आम्ही बघतो. कारण पोलिसांकडून त्यांचे रक्षण होणार आणि आमच्यावर दंडुके चालणार असतील तर गद्दारांचे राजकीय आयुष्य आता अल्प राहिले आहे. गद्दारीचा शिक्का आहे पण चोर म्हणून लावलेला शिक्का पुसता येणार नाही. बॅरिकेंड्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो, परंतु सणामुळे संयम पाळला. सरकारने भाडोत्री गुंडाना तिथे यायला द्यायला नको. दरवेळी आमच्याकडून संयम पाळला जाईल असं नाही. मग पोलिसांना बाजूला ठेवा जे व्हायचे ते होऊ द्या असं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला दिले.
दरम्यान, प्रशासनाने जे काही डबडं तिथं ठेवले आहे ते उचलले पाहिजे. त्यांना परवानगी दिली आहे का? आम्ही या प्रकरणी कोर्टात गेलो आहोत. तिथे खोके सरकारचा कंटेनर आहे. कदाचित खोके रिकामे झाले म्हणून कंटेनर ठेवला असेल. तो त्यांच्या बापजाद्यांकडे पाठवा. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाणेकर सक्षम आहेत. कारण गद्दारांना धडा शिकवा, आमच्या आनंद दिघेंचा गुरुमंत्र ठाणेकरांनी जोपसला आहे. ठाण्यात गद्दारी चालणार नाही. मी काही दिवसांनी ठाण्यात सभा घेईन. जिथे जिथे चोरांची गुंडागर्दी होईल तिथे एकजुटीने उभं राहा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.