'नीरज चोप्राचे यश तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल'; CM शिंदेंनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:44 PM2023-08-28T12:44:57+5:302023-08-28T12:45:50+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नीरज चोप्राचे कौतुक केले आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा अंजु बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर पहिला भारतीय ठरला होता. पण, आज नीरजने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे वैयक्तिक पदक जिंकून इतिहास रचला. त्याने २०२२ मध्ये जागतिक स्पर्धेचे रौप्यपदक जिंकले होते, परंतु आज त्याने गोल्डन कामगिरी केली. त्याने दुसऱ्या प्रयत्नात फेकलेला ८८.१७ मीटर लांब भाला, सुवर्णपदक निश्चित करण्यासाठी पुरेसं ठरलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रौप्यपदक जिंकून सर्वांना अचंबित केले.
नीरज चोप्राच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरज चोप्राचे कौतुक केले आहे. प्रतिभावान नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे उदाहरण आहेत. त्याचे समर्पण, अचूकता आणि उत्कटता त्याला केवळ अथलेटिक्समध्येच चॅम्पियन बनवत नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वातील अतुलनीय उत्कृष्टतेचे प्रतीक देखील आहे. जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नीरज चोप्राचे कौतुक केले आहे. शाब्बास नीरज..! भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने अचूक भालाफेक करून हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ८८.१७ मीटर दूर भालाफेक फेकून त्याने या खेळातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याची ही कामगिरी तमाम भारतीय नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे. त्याने मिळवलेले हे यश या खेळाकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. अभिनंदन नीरज आणि भालाफेक खेळातील भावी कारकिर्दीकरता हार्दिक शुभेच्छा, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केलं आहे.
शाब्बास नीरज..!
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 28, 2023
भारताचा #गोल्डन_बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय भालाफेकपटू #नीरज_चोप्रा ने अचूक #भालाफेक करून हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत #सुवर्णपदक पटकावले आहे.
८८.१७ मीटर दूर भालाफेक फेकून त्याने या खेळातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध… pic.twitter.com/P6PM672RlP
नीरजची सुवर्ण कामगिरी
नीरजने यापूर्वी २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. २०१६ मध्ये नीरज हे नाव जगभरात प्रथम पोहोचले. त्याने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा ८६.४८ मीटर लांब भालाफेकून जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याशिवाय डायमंड लीग ( २०२२), आशियाई स्पर्धा ( २०१८), राष्ट्रकुल स्पर्धा ( २०१८), आशियाई अजिंक्यपद ( २०१७), दक्षिण आशियाई ( २०१६) स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे.