24 जानेवारीला महाराष्ट्र बंद; आंबेडकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:31 PM2020-01-19T14:31:40+5:302020-01-19T14:34:30+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मुंबईः वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यासंदर्भातच भेट होती. त्यांनी आम्हाला विनंती केली की, जसं मागच्या वेळी दादर टीटीचं आंदोलन शांततेत घडलं. त्याच शांततेत हे आंदोलन झालं पाहिजे, आम्हीसुद्धा त्यांना सांगितलं की दादरचं जसं शांततेत आंदोलन झालं, तसंच आंदोलन आताही होणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
आर्थिक दिवाळखोरीसंदर्भात त्यांनी माहिती मागितली आणि मी त्यांना कळवलेलं आहे. बजेटमध्ये 24 लाख कोटी जमतील असं शासनानं सांगितलं. नोव्हेंबर महिन्यात इकोनॉमिक सर्व्हे ऑफ इंडियाचा जो रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टनुसार फक्त 11 लाख कोटी जमलेत, अशी माहिती आहे. 1 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जाईल. त्या दरम्यान 3 लाख कोटी न जमल्यास शासनाकडे शासन चालवण्यासाठी जो निधी लागतो तोसुद्धा उरणार नाही. लोक व्यवहार करत नाहीत आणि व्यवहार करत नसल्यानं शासनाला जो महसूल हवा आहे तो मिळत नाही.
24 जानेवारीला शांततेत बंद होईल. अनेक बँकांच्या संघटनांनी सहभागी होण्याचं कबूल केलं आहे. एसटीवालेसुद्धा सहभागी होईल. एकंदरीत आर्थिक झळ फार मोठ्या प्रमाणात बसली असून, त्याची चर्चा होत नाही. एनआरसी, सीएआरची चर्चा होते, तशी याची चर्चा होत नाही. 40 टक्के हिंदू बाधित होतील, त्यांची नावं आम्ही देणार आहोत. हिंदूंमधीलच काही जातीसंदर्भात आम्ही ही माहिती देणार आहोत. मुस्लिम लोक जागरूक झालेले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.