आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 08:25 AM2023-10-31T08:25:24+5:302023-10-31T08:26:20+5:30
Maharashtra Bandh Update: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे.
काल दिवसभरात जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल साईट्सवर पोस्ट मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहेत. हे सर्व मराठा आंदोलक करत असले तरी अशाप्रकारे कोणताही बंद आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांकडून पुकारण्यात आलेला नसल्याचा खुलासा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बंद बाबत व्हायरल होत असणाऱ्या मेसेजवर मराठा समाजाने भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र बंदचा कोणताही मेसेज जरांगे पाटलांकडून आलेला नाही. यामुळे सर्व आहे तसे सुरु राहणार असल्याचे ठाण्याताल मराठा समाजाने सांगितले आहे.
दरम्यान, साताऱ्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. आज पुकारण्यात येणाऱ्या बंद मध्ये सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. हा बंद अगदी शांततेत पार पाडावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे.
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटीजवळ मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. सोलापूर - पुणे महामार्गांवर टायर जाळून मराठा आंदोलकांनी महामार्ग अडविला होता. सोलापूर - पुणे महामार्ग अडवल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याचे कारण देत धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत. बीड जिल्ह्यामध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.