Eknath Shinde : राज्यात पावसाचा धुमाकूळ, CM एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर; आर्मी, नेव्हीच्या तुकड्या सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:27 PM2024-07-25T12:27:26+5:302024-07-25T12:31:35+5:30
Eknath Shinde And Maharashtra Rain : मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. "मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे, मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत, ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे."
"काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश" देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
"एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाउस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे."
#WATCH | On the rainfall situation Mumbai, Pune and Raigad districts, Maharashtra CM Eknath Shinde says, " There is water on the roads and in houses of people in Pune. There is a lot of rain at Khadakwasla Dam and in the catchment area. The District Collector, Municipal… pic.twitter.com/wXECIy2aCL
— ANI (@ANI) July 25, 2024
"मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. मुंबईत काही कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे."
"मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेले पाणी काढण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु आहेत. मी मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे. पाउस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, माझं आपणास आवाहन आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि फिल्डवर उतरून काम करत आहे" असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.