शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; केंद्रीय मंत्र्यांसह देशभरातील 400+ साधू-संतांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:54 IST2024-12-03T17:54:38+5:302024-12-03T17:54:51+5:30
येत्या 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; केंद्रीय मंत्र्यांसह देशभरातील 400+ साधू-संतांना निमंत्रण
Maharashtra CM : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून, हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला 70 हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
400 साधू-संतांना निमंत्रण
याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील 400+ साधू-संतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय, विविध समाजाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेल्या संतांमध्ये जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज, गोविंददेव गिरी महाराज, बागेश्वर बाबा, महामंडलेश स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, जैन संत लोकेश मुनी, बंजारा संत, शीख संत, बौद्ध भिक्खू यांचा समावेश आहे. याशिवाय काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आणि महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी, यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.