Maharashtra CM: ठरलं ! सर्वोच्च न्यायालयात रविवारी सकाळीच होणार याचिकेवर सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 10:53 PM2019-11-23T22:53:19+5:302019-11-23T22:54:11+5:30
Maharashtra CM: काँग्रेस, शिवसेनेने भाजपा-राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच, भाजपाच्या या खेळीविरोधात महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. आता, या याचिकेवर रविवारी सुट्टीदिवशी सुनावणी होणार आहे.
काँग्रेस, शिवसेनेने भाजपा-राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली? केंद्र सरकारने राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस कधी केली? राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस कधी स्वीकारली? राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं? मुख्य न्यायाधिशांना शपथविधीला बोलवण्यात आलं नाही? शपथविधी किती वाजता झाली? माध्यमांना का बोलवण्यात आलं नाही? असे असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच या याचिकेत विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलवावं, 24 तासांत फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सभागृहात आवाजी मतदानाने ठराव संमत करू नये. या संपूर्ण घडामोडीचे व्हिडीओ चित्रीकरण कराव अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर रविवारी सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे.