मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारींनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:06 AM2021-12-30T06:06:56+5:302021-12-30T06:07:17+5:30
Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते.
मुंबई : ‘आपल्या पत्रातील असंतुलित आणि धमकीवजा सूर बघून मी खूपच दु:खी झालो. अशा पत्रामुळे राज्यपालांच्या उच्चतम संवैधानिक कार्यालयाची प्रतिमा खालावली गेली, तिचे अध:पतन झाले,’ या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे संमती मागितली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे तीन ज्येष्ठ मंत्री राज्यपालांना गेल्या रविवारी जाऊन भेटले आणि त्यांनीही साकडे घातले. त्यावर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मी निर्णय देईन, असे राज्यपाल म्हणाल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले होते.
राज्य सरकारने सोमवारी सकाळी राज्यपालांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले. सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत पत्र पाठविले. ‘राज्यपालांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये. विधानमंडळाने केलेले कायदे तपासण्याचा अधिकार आपल्याला नाही,’ असे ठाकरे यांनी पत्रात सुनावले होते. याच पत्राचा संदर्भ देत राज्यपालांनी मंगळवारी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात ही नाराजी बोलून दाखविली.
राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते. अध्यक्ष निवडीबाबतची प्रक्रिया ठरवायला तुम्ही ११ महिने घेतले आणि नियम आमूलाग्र बदलले. याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कायदेशीर अभ्यास करणे गरजेचे आहे. संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.
राज्य सरकारदेखील राज्यपालांवर नाराज
- राज्य सरकार पण राज्यपालांवर नाराज आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलचा संघर्ष कालही टोकाला जावू शकला असता, पण राज्य सरकारने संयम बाळगला.
- राज्यपाल जेव्हा राजी होतील आणि अनुमती देतील तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.