१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; नाना पटोले म्हणाले, "देर आए दुरूस्त आए, आता तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:55 PM2021-04-19T20:55:01+5:302021-04-19T20:57:54+5:30
Coronavirus Vaccination : १ मेपासून देशात होणार लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात. १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस.
देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी "देर आए दुरूस्त आए" म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"देर आए दुरुस्त आए...कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या वयाची अट शिथील करून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी मी सातत्याने करत होतो. केंद्र सरकारने ती मान्य केली. आता त्यांनी राज्याला लसीचा मुबलक पुरवठा करावा म्हणजे लसीकरण मोहीम वेग घेईल," अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांकडून आभार व्यक्त
"काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहिल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.