आईच्या मरण यातना अनुभवण्यासाठी माऊंट एव्हरेस्टची चढाई; पोलीस अधिकाऱ्याची अनोखी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:51 AM2021-05-25T09:51:33+5:302021-05-25T09:52:14+5:30
नवी मुंबई पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाचे सहायक निरीक्षक संभाजी गुरव यांनी रविवारी माऊंट एव्हरेस्टच्या टोकावर पाऊल ठेवले.
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मृत्यूसमई आईला झालेल्या यातना आपण देखील सोसाव्यात या भावनेतून पोलीस अधिकाऱ्याने माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. चार वर्षापूर्वी ते माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे याच एव्हरेस्टच्या टोकावरून आईला श्रद्धांजली वाहण्याचा अनोखा संकल्प त्यांनी मनाशी केला होता.
नवी मुंबई पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाचे सहायक निरीक्षक संभाजी गुरव यांनी रविवारी माऊंट एव्हरेस्टच्या टोकावर पाऊल ठेवले. त्यांनी ९ एप्रिलला काठमांडू येथून या मोहिमेला सुरवात केली होती. तर चार दिवसांपूर्वी त्यांनी एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्याला सुरवात केली असता रविवारी २३ मे रोजी त्यांनी शिखरावर झेंडा रोवला. यावेळी पावलोपावली मरणयातना देणारी चढाई सर करून आपण आईला श्रद्धांजली वाहिल्याची भावना संभाजी गुरव यांनी व्यक्त केली.
या यशातून त्यांनी डेथ झोन समजल्या जाणाऱ्या उंची पलीकडे जाऊन पोलीस दलाचा व देशाचा झेंडा रोवला आहे. आजवर त्यांनी ६ हजार मीटर पर्यंतचे पर्वत चढाई केले आहेत. परंतु ८ हजार मीटर पेक्षा अधिक उंचीचा माऊंट एव्हरेस्ट त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सर करून महाराष्ट्र पोलीस व नवी मुंबई पोलीसांचा लौकिकता अधिक वाढवला आहे. मात्र माऊंट एव्हरेस्ट सर करण्यामागची त्यांची भावना आईला मृत्यू समई झालेल्या वेदनांची जाणीव करून घेण्याची व टोकावून आईला श्रद्धांजली वाहण्याची होती.
२०१७ साली ते माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला असतानाच त्यांच्या आईचे ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. परंतु आजाराची लक्षणे अगोदर ओळखून आपण आईला योग्य उपचार देऊ शकतो नाही याची त्यांना खंत वाटत होती. यामुळे आपल्याला अधिकाधिक वेतना होतील असे काहीतरी करून मृत्यू समई आईला किती वेदना झाल्या असतील हे जाणून घेण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. यातूनच माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेत त्यांनी त्या दिशेने पाऊल टाकले. यादरम्यान रक्त गोठवणारी थंडी व इतर अनेक कठीण प्रसंगांचा त्यांनी तोंड दिले. यावेळी होणाऱ्या प्रत्येक वेदनेवेळी ते आपल्या आईला आठवत होते. अखेर प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात रविवारी त्यांनी माऊंट एव्हरेस्टच्या टोकावर पाऊल ठेवले. यादरम्यान देशाचा ध्वज व पोलिसांच्या ध्वजाबरोबरच आईची प्रतिमा देखील सोबत आणली होती. मरण यातना सहन करत मिळवलेले यश हिच आपल्या आईला श्रद्धांजली असल्याची भावना देखील त्यांनी लोकमतला व्यक्त केली.