आमच्या लोकांची काळजी घेणार, कुणालाही वार्यावर सोडणार नाही ही आमची प्राथमिकता : नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 03:57 PM2021-04-12T15:57:28+5:302021-04-12T15:58:49+5:30
आम्ही केंद्राच्या सूचनांचे तंतोतंत पालन करतोय, मलिक यांची माहिती
"आम्ही आमच्या लोकांची काळजी घेणार, कुणालाही वार्यावर सोडणार नाही याला आमचं प्राधान्य आहे. भाजपशासित राज्यामध्ये काय चाललं आहे, याकडे केंद्राने लक्ष द्यावे," असा सल्ला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
केंद्रसरकार ज्या काही सूचना देत आहे त्याची तंतोतंत अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. ज्या जिल्हयात टेस्टींगच्या क्षमता कमी आहेत तिथे मशीन खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र काही राज्यात अन्टीजेनच्या आधारावर आकडे दाखवले जात असल्याची वस्तुस्थिती नवाब मलिक यांनी मांडली. आपल्या राज्यात ८० टक्के आरटीपीसीआर होतो. प्रत्येक जिल्ह्यात आरटीपीसीआर करण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. आम्ही केंद्राच्या सूचनांचे तंतोतंत पालन करतोय आणि त्याची अंमलबजावणीही करु. परंतु केंद्र सरकारने पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश यांनाही सूचना द्याव्यात असेही नवाब मलिक म्हणाले.
उत्तर प्रदेशात राम भरोसे कारभार
"उत्तर प्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर करत नाही. अॅन्टीजेन चाचण्या ८० टक्के अॅक्युरसी नाहीत. युपी सरकारने योग्यप्रकारे टेस्टींग केल्या तर वेगळी परिस्थिती होऊ शकते," असेही नवाब मलिक म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्यसरकार जिंदाबाद... मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. परंतु तिथे गेल्यावर भाजपचा मुर्दाबाद केला हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.