Maharashtra Coronavirus Updates : सक्ती नाही, पण मास्क वापरा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 01:07 PM2022-06-04T13:07:48+5:302022-06-04T13:17:19+5:30
Maharashtra Coronavirus Updates : इंग्रजीत मस्ट हा शब्द वापरल्यानं तो सक्तीचा असा होत नाही, ते आवाहन आहे, टोपे यांचं स्पष्टीकरण.
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत असल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क सक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"आपल्याकडे मुबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये थोड्याप्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाकडून पत्रक आलं आहे. या जिल्ह्यातील लोकांसाठी उपाययोजना कराव्या लागतील आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागतील. त्याबाबती टास्क फोर्सची एक बैठक झाली. यात बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करावं, असं ठरवण्यात आलं. तो आवाहनाचा मुद्दा आहे, त्यात मास्कसक्ती नाही," असं स्पष्टीकरण टोपे यांनी दिलं. इंग्रजीत मस्ट हा शब्द वापरल्यानं तो सक्तीचा असा होत नाही, मॅंडेटरी असा होत नसल्याचंही ते म्हणाले.
"जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे याबाबचे रुग्ण फ्लू आजारासारखे पॉझिटिव्ह होतायत आणि बरे होतायत. पॅनिक होण्याची परिस्थिती नाही. जे पॉझिटिव्ह होतायत ते त्यांच्या इम्युनिटीनेच बरे होतायत असं मला दिसून येतंय," असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पंधरा वीस दिवस आपल्याला परिस्थिती पाहता येईल, त्यानंतर परिस्थिती आणि संख्या पाहून मास्कसक्ती करायची का हे ठरवलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.