कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० ते ५० हजारांपर्यंत दंड; काय आहेत नवे नियम?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 08:41 PM2021-11-27T20:41:26+5:302021-11-27T21:21:07+5:30
कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल
मुंबई – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता राज्यात सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. शनिवारी जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे. कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.
महाराष्ट्र राज्यात प्रवास
महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे त्यांना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांना एकतर संपूर्ण लसीकरण किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
कोणताही कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीवरील निर्बंध
कोणताही कार्यक्रम,समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.
संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता,औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे) संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.
कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील.
नियमांचे उल्लंघन केल्यास...
कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.
ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.
जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,
तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
पाहा व्हिडीओ