महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे
By Admin | Published: January 6, 2017 08:33 PM2017-01-06T20:33:57+5:302017-01-06T22:18:26+5:30
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अभय आपटे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी अभय आपटे, सचिवपदी रियाझ बागवान, उपाध्यक्षपदी विजयकुमार ताम्हाणे आणि चंद्रकांत मते यांची निवड झाली आहे. एमसीएने आज बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. न्या. लोढा समितीच्या शिफारशींनुसार, संघटनेत ९ वर्षे पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना यापुढे पद भूषविता येणार नसल्याचा आदेश अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या आदेशाची अंमलबजावणी करीत अजय शिर्के यांनी एमसीएचे अध्यक्षपद सोडले. सुधाकर शानभाग यांनी सचिवपदाचा तसेच धनपाल शाह आणि कमलेश ठक्कर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी अनुक्रमे बागवान, ताम्हाणे आणि मते यांची निवड झाली आहे. ताम्हाणे हे पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे सचिव असून यांच्या रूपात पीवायसीतील पदाधिकाºयांची प्रथमच एमसीएच्या मोठ्या पदावर निवड झाली आहे. एमसीएतील या ४ पदांसाठी आजच्या विशेष बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांबाबत एकमताने निर्णय झाला. शिर्के यांनी बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. शिर्के म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालय आणि बीसीसीआय यांच्यातील वाद आता इतिहासजमा झाला आहे. त्यावर आणखी भाष्य करणे योग्य नाही. या घटनेतून खूप काही शिकण्यासारखे आहे. बीसीसीआयच्या उज्वल यशामध्ये शरद पवार, माधवराव सिंधिया, एन.के.पी साळवे, जगमोहन दालमिया यांचे योगदान मोठे आहे. एमसीएची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. यासंदर्भात अलीकडे आलेल्या बातम्या निराधार आहेत.’’
एमसीएच्या या बैठकीला २६ पैकी २२ पदाधिकारी उपस्थित होते. अरूण जगताप, कमलेश ठक्कर, सचिन मुळे आणि प्रियंका थोरवे या बैठकीला अनुपस्थित होते. सचिवपदी निवड होण्याआधी रियाझ बागवान हे एमसीएच्या रणजी संघ निवड समितीचे तसेच स्पर्धा समितीचे अध्यक्ष होते. आता त्यांनी या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही समितीच्या अध्यक्षांची नावे लवकरच जाहीर केली जाईल, असे बागवान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.