MCA च्या पुण्यातील स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार नाव द्या; धनंजय मुंडेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:10 PM2023-06-16T22:10:38+5:302023-06-16T22:11:07+5:30
शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.
पुणे - शहरातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्याबाबत धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांना पत्र पाठवले आहे.
धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटलंय की, आयपीएलच्या धर्तीवर MPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार साहेबांच्या कारकिर्दीत होऊ शकले, याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे.
पद्मविभूषण आदरणीय @PawarSpeaks साहेबांचे क्रिकेट विश्वात मोठे योगदान आहे. साहेबांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास आदरणीय साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एमसीएचे अध्यक्ष आमचे बंधू आ. @RRPSpeaks दादांकडे… pic.twitter.com/Ucag2XFlTf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 16, 2023
गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आ.रोहित पवार यांच्याकडे केली आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.