Maharashtra Day 2022 : लाभले आम्हास भाग्य बोलतो 'मराठी'! महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 10:41 AM2022-05-01T10:41:00+5:302022-05-01T10:42:15+5:30

Maharashtra Day 2022 : मराठी, हिंदी, उर्दू , कानडी व हिंदी अशा विविध भाषांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या या बोलीभाषा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मानले जाते.C

Maharashtra Day 2022 special languages spoken in all over maharashtra | Maharashtra Day 2022 : लाभले आम्हास भाग्य बोलतो 'मराठी'! महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास

Maharashtra Day 2022 : लाभले आम्हास भाग्य बोलतो 'मराठी'! महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास

googlenewsNext

मुंबई - देशाच्या नकाशावर वैशिष्टपूर्ण भौगोलिक व सामाजिक रचनेमुळे महाराष्ट्राचे स्थान सदोदित अनन्यसाधारण राहिले आहे. भौगोलिक आकारमानानुसार महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक विविधता पाहायला मिळते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब येथील भाषांवरही दिसते. त्यामुळेच महाराष्ट्रात अगदी कोसाकोसावर भाषेचा लहेजा बदलत जातो. यामधूनच राज्यात अनेक स्थानिक बोलीभाषा अस्तित्वात आल्या आहेत. मराठी, हिंदी, उर्दू , कानडी व हिंदी अशा विविध भाषांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या या बोलीभाषा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मानले जाते.

मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. विशिष्ट हेल काढून आलेले अनुनासीक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. 

कोल्हापुरी - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात कोल्हापुरचे विशेष स्थान आहे. ग्रामीण लहेजा असणाऱ्या या भाषेचा रांगडेपणा विशेष लक्ष वेधून घेतो. 

बेळगावी - महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेवर असणाऱ्या बेळगावात ही भाषा बोलली जाते. कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून ही बोलीभाषा निर्माण झाली आहे. 

आगरी - आगरी बोली ही महाराष्ट्राच्या  उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारा मोठा समाज आहे.

नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. यावर काही प्रमाणात हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.

मराठवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्य़ात ही बोलीभाषा वापरली जाते. या बोलीभाषेवर कानडी व उर्दू भाषेचा प्रभाव आहे. 

वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी भाषेत लिहिला गेला. या बोलीभाषेवर फारसी व हिंदीचा प्रभाव आहे.

झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. 

अहिराणी - जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. 

तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. 

चंदगडी - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. 

देहवाली - देहवाली भाषा प्रामुख्याने भिल्ल समाजात प्रचलित आहे. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. 

वाडवळी - ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. 
 

Web Title: Maharashtra Day 2022 special languages spoken in all over maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.