Maharashtra Day:व्यसनाधीन ते व्यसनमुक्ती....मुक्तांगणच्या दत्ता श्रीखंडेची अनोखी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:35 AM2018-05-01T07:35:45+5:302018-05-01T07:35:45+5:30
आता सगळं संपलं असं वाटत असताना एका नव्या अध्यायाची, सकारात्मक आयुष्याची ही खरंतर कहाणी. फिनिक्स पक्ष्यासारखेच सगळं संपलं असताना नव्या आयुष्याची सुरुवात करुन समाजात सकारत्मकतेची उर्जा भरणाऱ्या मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या दत्ता श्रीखंडे यांची कहाणी सर्वांसाठीच प्ररेणादायी आहे.
पुणे- राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची कहाणी सगळ्यानांच माहित आहे. आता सगळं संपलं असं वाटत असताना एका नव्या अध्यायाची, सकारात्मक आयुष्याची ही खरंतर कहाणी. फिनिक्स पक्ष्यासारखेच सगळं संपलं असताना नव्या आयुष्याची सुरुवात करुन समाजात सकारत्मकतेची उर्जा भरणाऱ्या मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या दत्ता श्रीखंडे यांची कहाणी सर्वांसाठीच प्ररेणादायी आहे. वयाच्या 14 व्या वर्षी व्यसनाने ग्रासलेले दत्ता श्रीखंडे 28 व्या वर्षी मुक्तांगणमध्ये दाखल झाले. मुक्तांगणमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात करत येथेच राहून शेकडो व्यसनाधीन तरुणांमध्ये सकारात्मक उर्जा भरुन त्यांना नवं आयुष्य सुरु करण्यास आता ते मदत करत आहेत.
दत्ता श्रीखंडे मुळचे मुंबईच्या अंबरनाथचे. वयाच्या 14 व्या वर्षापासून दारु चे व्यसन लागले. शिक्षण केवळ 5 वी. 1983 ते 1992 या काळात ते ब्राऊन शुगर, चरस, गांजा यांसारख्या अमली पदार्थांच्या अंमलाखाली होते. या व्यसनाने शरीराची काडी झाली होती. व्यसनासाठी गुन्हे करण्यासही त्यांनी सुरुवात केली. 1986 ला त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्यात त्यांना अटक झाली. 1989 ला तर तडीपारही करण्यात आले. उमेदीच्या वयात लागलेल्या व्यसनामुळे अख्खं आयुष्य वाया जाण्याच्या वाटेवर हओतं. व्यसनामुळे मेंटल हॉस्पिटलमध्येही त्यांना भरती व्हायला लागलं. शेवटी पोलिसांच्या मदतीने त्यांना मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले आणि त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय खऱ्या अर्थाने सुरु झाला.
आज दत्ता श्रीखंडे हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. या आधी त्यांनी येथेच समुपदेशक म्हणून काम करत महराष्ट्रातील शेकडो तरुणांना व्यसनापासून परावृत्त केले आहे. या केंद्रात येणाऱ्या नव्या पेशंटला ते आपली कहाणी सांगत तुम्हीसुद्धा एका नव्या आयुष्याची सुरुवात करु शकता ही सकारात्मक उर्जा त्यांच्यात ते निर्माण करतात. माझ्यासारखा व्यसनात बुडालेला व्यक्ती बरा होऊन एक सुखी आयुष्य जगू शकतो, तर तुम्हीही नक्की बरे होऊ शकता हा संदेश ते आपल्या पेशंटला देतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंब आज सुखी आयुष्य जगत आहेत.
दत्ता श्रीखंडे गेली 28 वर्षे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात लोकांना व्यसनातून मुक्तता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्येसुद्धा त्यांच्या कार्याचा व त्यांच्या कहाणीचा उल्लेख केला होता. स्वतः व्यसनापासून मुक्त झाल्यानंतर आपल्याप्रमाणेच जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांना यातून मुक्त करण्यासाठी काम करायचे असा त्यांनी निर्धार केला आणि व्यसनमुक्ती केंद्रातच त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
श्रीखंडे हे पेशंट म्हणून मुक्तांगणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी येथील किचनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे पदार्थ येथील सर्वांना आवडू लागल्याने अनिल अवचटांनी त्यांना रेसिपीची काही पुस्तकं दिली. त्यांच्या आधारे त्यांनी अनेक पदार्थ तयार केले. एवढेच नाही तर ते थेट मास्टर शेफ या स्पर्धेत शेवटच्या 25 स्पर्धाकांमध्ये जाऊन पोहोचले.या काळात मुक्तांगणमध्ये समुपदेशक म्हणून त्यांचा कामाचा झपाटा चालू होता. या काळात त्यांचे लग्नही झाले. मुलांना चांगले शिक्षण त्यांनी दिले.परंतु आपले वडीलांनी सोडलेलं अर्धवट शिक्षण त्यांनी पुर्ण करायला हवं असं मुलांना वाटत होतं. दत्ता यांनीसुद्धा शिक्षण पूर्ण करण्याचा विडा उचलला. त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवली. पुढे मराठी साहित्यात एम.ए.सुद्धा फस्ट क्सासमध्ये ते पास झाले. पुढे पीएचडी करण्याचा त्यांचा मानस आहे. एवढेच नाहीतर एकेकाळी व्यसनाने ग्रासलेल्या शरीराला त्यांनी व्यायामाने सुदृढ केलं आणि अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदकही पटकावलयं.
आपल्याला मिळालेलं सुंदर आयुष्य आपण व्यसनापायी वाया घालवू नये असं त्यांना वाटतं. यासाठी स्वतःची कहाणी ते व्यसनाधीन तरुणांना सांगत त्यांना एक प्रेरणा देण्याचे काम करतात. त्यांची कहाणी ऐकून परदेशातूनही सात लोक मुक्तांगणमध्ये आपले व्यसन सोडविण्यासाठी दाखल झाले होते. मुक्तांगणमध्ये पेशंट दाखल झाल्यानंतर श्रीखंडे त्यांना समुपदेशन करुन आपली कहाणी सांगतात. यापुढे नवीन आयुष्य सुरु करण्यास प्रोत्साहित करतात. त्यांची कहाणी ऐकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक पेशंट त्यांच्याकडे येऊन आपल्याला या व्यसनांपासून लांब जात तुमच्या सारखे नवीन आयुष्य सुरु करायचे असे सांगतात. यावेळी मिळणारं समाधान जगात कुठेच मिळणार नाही असं दत्ता श्रीखंडे म्हणतात.
उत्तम पदार्थ तयार करता यायला लागल्यावर एखादं हॉटेल त्यांना सहज सुरु करता आलं असतं, किंवा बरं होऊन येथून बाहेर पडत एक वेगळी सुरुवात त्यांना करता आली असती. परंतु आपलं पुढील आयुष्य हे फक्त व्यसनाधिन लोकांना त्यापासून लांब घेऊन जाण्यासाठी आपण घालवायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्याच्यासाठी गेली 28 वर्षे ते अविरत काम करीत आहेत. त्यांना शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यातसुद्धा आले आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे तो पर्यंत हे काम करत राहणार असल्याचे श्रीखंडे म्हणाले. आपल्यानंतर हे काम थांबू नये यासाठी त्यांना नवी पिढी घडवायची आहे. व्यसनाधिन तरुण ते व्यसनमुक्तीचा प्रेरणास्त्रोत असा दत्ता श्रीखंडेंचा प्रवास सर्वांसाठी एक सकारात्मक उर्जा देणारा आहे.