Maharashtra Day: नर्तक ते निर्माता; रत्नकांत जगतापचा अभिमानास्पद प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 10:39 AM2018-05-01T10:39:34+5:302018-05-01T10:41:51+5:30
जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर नेत्रदीपक यश
- अजय परचुरे
ही कहाणी आहे गिरणगावात लहानाचा मोठा झालेल्या आणि एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरी जन्माला आलेल्या रत्नाकांत दशरथ जगताप या अवलियाची. अनेक सिनेतारकांच्या मागे डान्सर म्हणून करिअर सुरू करणारा रत्नकांत बघता बघता याच मराठी चंदेरी दुनियेच्या अनेक सिनेमांचा कार्यकारी निर्माता बनला. मराठी माणसाने घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. पण यामागे होती प्रचंड जिद्द, चिकाटी आणि पडेल ते काम करण्याची तयारी.
गिरणगावात जन्माला आल्यामुळे रत्नकांतमध्ये कलेचे गुण येण्यास फार काळ लागला नाही. पालिका शाळेत शिक्षण घेत असताना रत्नकांतचे पाय आपोआप नृत्याकडे वळले होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात रत्नकांतने याच पायावर आपलं पुढचं भविष्य घडवायचं हे मनाशी पक्कं केलं होतं. रत्नाकांतने आपलं महाविद्यालयीन शिक्षण आर. एम. भट ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केलं. या महाविद्यालयात असतानाच उत्कर्ष मंडळात रात्रीच्या अभ्यासिकेसाठी रत्नकांत अभ्यासाला जायचा. मात्र त्या ठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रत्नकांतचे मन वेधून घेतलं होतं. आणि स्वत:मधला कलाकार शोधण्यासाठी कृष्णविवर, प्रेमाच्या गावे जावे या एकांकिकामधून रत्नकांतने काम केले. घरातल्यांनी मात्र त्याला आधी नोकरी कर, याकडे नंतर लक्ष दे, असा सल्ला दिला. पण रत्नकांतचे मामा त्याच्या पाठिशी उभे राहिले. घरच्यांचा विरोध थोडा कमी व्हावा म्हणून रत्नकांतने एका खासगी कंपनीत नोकरी केली. पण त्याचं मन मात्र तिकडे रमत नव्हतं. उत्कर्ष मंडळात तो कलाप्रमुख झाला होता. पण म्हणावं तसं काही घडत नव्हतं. अंगभूत असलेली नृत्याची कला त्याला खुणावत होती. त्याने थेट नृत्यालिकाच्या संचालिका किशु पाल यांना गाठले आणि आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आणि इकडे रत्नकांतच्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. उत्कर्षच्या अनेक नृत्यनाटिंकामध्ये त्याने अभिनय आणि नृत्य केलं. आणि त्यामुळे तो थेट चंदेरी दुनियेत जाऊन पोहोचला .ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनी त्याला बऱ्याच सिनेमांमध्ये नृत्य करण्याची संधी दिली. हे करत असतानाच सिनेमासृष्टीतील मॅनेजमेंटही तो हळूहळू शिकत होता. सिनेमातील गाण्याचे टेकिंग झाल्यावर कार्यकारी निर्मात्यांना मदत करणे, हिशोब ठेवणे, शूटींगला लागणारी सामुग्री उपलब्ध करून देणे, अशी सगळी कामं तो मेहनतीने आणि मनापासून करू लागला. यातूनच त्याला आपली एक यशस्वी दिशा सापडली.
रत्नकांतच्या या मॅनेजमेंट स्कीलने रंगभूमीलाही प्रभावित केले. आणि एक उत्तम प्रकाशयोजनाकार ही रंगभूमीवरची त्याची नवीन ओळख बनली. याचबरोबर तो नाटकांच्या प्रयोगाला लागणाऱ्या लाईट्सची व्यवस्थाही पुरवायला लागला. ज्याच्यात पैसा ते करिअर हा मंत्र त्याला प्रकाशयोजनेतून कळला. स्वत:चे अत्याधुनिक लाईटसचे सामान त्याने मेहनतीने उभे केले आणि हाच त्याचा व्यवसाय बनला. रंगभूमीवरील २५ हून जास्त व्यावसायिक नाटकांना त्याने प्रकाशयोजनाची सामुग्री त्याच्या ओमकार आर्ट्स कंपनीतर्फे पुरवण्यात आली. यात व्यक्ती आणि वल्ली, गेला उडत, डोण्ट वरी बी हॅप्पी या हिट नाटकांचा समावेश आहे. नर्तक, व्यवस्थापक, प्रकाशयोजनाकार, सामुग्रीकार अशी मजल दरमजल तो करत होता. अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याचं व्यवस्थापनही रत्नकांत आणि त्याच्या टीमने लिलया पेललं.
आता त्याला चंदेरी दुनिया खुणावू लागली आणि बदलेल्या मराठी सिनेमांची आव्हानं पेलण्यासाठी रत्नकांत अनेक मराठी हिट सिनेमांचा कार्यकारी निर्माता बनला, ज्यात केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सुबोध भावे, अविनाश खर्शीकर अशा रथी महारथींच्या सर्व सिनेमांचा समावेश आहे. कट्यार काळजात घुसली या अजरामर सिनेमाला कार्यकारी निर्माता म्हणून रत्नकांतने केलेलं कामाचं कौतुक संपूर्ण मराठी इंडस्ट्रीने केलं. रत्नकांत इतक्यावरच थांबला नाही. आपण ज्या मुशीतून वर आलो त्या रंगमंच कामगारांना तो अजून विसरलेला नाही. रंगभूमीवरील रंगमंच कामगारांच्या न्यायासाठी त्याने रंगमंच कामगार संघटनेची मोट बांधली. ज्याचा तो अनेक वर्ष अध्यक्ष आहे. रंगमंच कामगारांना त्यांची हक्काची घरं उपलब्ध करून देण्यापासून ते त्यांना हककाचे पैसे मिळवून देण्याचे कार्य तो आजही करतोय. मराठी कलाकारासाठी, कामगारांसाठी सदैव लढणारा रत्नकांत जगताप मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच एक सच्चा रंगकर्मी आहे.