‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:51 AM2024-05-01T09:51:13+5:302024-05-01T09:52:17+5:30
Maharashtra Din: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना राज्यपाल रमेश बैस यांनी उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन यांनी केले.
मुंबई - महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिवस आज राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना राज्यपाल रमेश बैस यांनी उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणाले की, सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे.
महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे. राज्यात उच्च दर्जाची विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आहेत. विलोभनीय विस्तीर्ण समुद्रकिनारे, पर्वत रांगा, वने, गड-किल्ले, नदी खोरे आणि पठारे अशा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेला, जैवविविधतेने नटलेला महाराष्ट्र पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्याच्या विकासात मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांचे मोठे योगदान आहे, असे राज्यपाल म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्यातील जनतेला मतदान करण्याचंही आवाहन केलं. ते म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये नियमितपणे होणाऱ्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.