Maharashtra Day: मुस्लिम समाजाच्या उद्धाराची चळवळ चालवणारे शमशुद्दीन तांबोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 09:40 AM2018-05-01T09:40:17+5:302018-05-01T09:45:16+5:30

अन्याय, अत्याचाराची भिंत भेदून मुस्लिम महिलांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्याचं काम शमशुद्दीन तांबोळी करत आहेत.

Maharashtra Day shamsuddin tamboli working for muslim communities welfare | Maharashtra Day: मुस्लिम समाजाच्या उद्धाराची चळवळ चालवणारे शमशुद्दीन तांबोळी

Maharashtra Day: मुस्लिम समाजाच्या उद्धाराची चळवळ चालवणारे शमशुद्दीन तांबोळी

Next

शायराबानोचा लढा सर्वांनाच माहित आहे. ट्रिपल तलाकसारख्या मुस्लिम समाजातील अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध अजूनही महिलांना झगडावं लागतंय. मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क हवे आहेत. समाजात योग्य स्थान हवं आाहे. परंतु अजूनही मुस्लिम समाजातील काही प्रतिगामी शक्ती त्यांच्यापुढे एका भिंतीसारख्या उभ्या आहेत. हिच अन्याय, अत्याचाराची भिंत भेदून मुस्लिम महिलांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्याचं काम शमशुद्दीन तांबोळी करत आहेत. मुस्लिम समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा दूर करुन एक शिक्षित, वैचारिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षक मुस्लिम समाज तयार करण्यासाठी शमशुद्दीन तांबोळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून काम करत आहेत. 

 हमिद दलवाई यांनी 2 मार्च 1970 रोजी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या संकल्पनेच्या प्रेरणेतून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. या मंडळा अंतर्गत मुस्लिम समाजातील अनिष्ठ रुढी परंपरांविरोधात आवाज उठविण्यास त्यांनी सुरुवात केली. तसेच मुस्लिम समाज हा मुख्य प्रवाहात यावा, त्याची उन्नती व्हावी यासाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. हमिद दलवाई यांचे 1977 साली निधन झाले. सध्या शमशुद्दीन तांबोळी हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. गेल्या काही दशकांपासून मुस्लिम समजाच्या उन्नतीसाठी तांबोळी काम करीत आहेत. शाहबानो प्रकरण, गुजरात हत्याकांड, बाबरी मशिद प्रकरण यांमधून सामाजिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरु असताना मुस्लिमांना घेऊन राष्ट्रीय एकात्मतेची चळवळ तांबोळी यांनी सुरु ठेवली. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे या देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे असं तांबोळी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या मुक्तीचा लढा लढायचा असेल तर समान नागरी कायदा अस्तित्वात येणं महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटतं. हिंदू समाजात जशी धर्म चिकित्सेची परंपरा आहे, तशीच परंपरा मुस्लिम समाजात रुजावी यासाठी मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. एक बुद्धीवादी मुस्लिम समाज निर्माण व्हावा अशी या मंडळाची इच्छा आहे. त्यासाठी सर्वप्रथम मुस्लिम मुलांना मदरश्यातून मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा प्रादेशिक तसेच इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा आग्रह धरण्यात आला. मदरश्यातून रोजचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी प्रादेशिक भाषा शिकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही मुस्लिम मुल्लांनी कुटुंब नियोजन हे मुस्लिम विरोधी आहे असे सांगितले होते. मात्र यामुळे मुस्लिम कुटुंबाची आर्थिक उन्नती कुठेतरी खुंटत होती. त्यामुळे हा समज मुस्लिमांमधून काढण्यासाठी तांबोळी आपल्या मंडळातर्फे काम करीत आहेत. 

हे कार्य चालू असताना मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाख, बहुपत्नी परंपरा अश्या महिलांच्या विरोधातील परंपरेला मूठमाती देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर तलाक पिडीत महिलांच्या अनेक परिषदा घेतल्या. या काळात तांबाेळींच्या मंडळाला विरोध करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची स्थापना करण्यात आली. परंतु मागे न फिरता त्यांनी आपले काम अविरतपणे सुरुच ठेवले. ताबाेळींना वाटते मुस्लिम महिला, तरुण शिकले तर ते व्यवस्थेला प्रश्न विचारु लागतील. धर्माची चिकित्सा करु लागतील. आणि यातूनच अनिष्ट रुढी परंपरांविरोधात आवाज बुलंद होईल. मंडळाच्या कार्यामुळे आजपर्यंत अनेक मुस्लिम नागरिकांना न्याय मिळाला आहे. आर्शिया बागबान या तरुणीचे ती 10वीत असताना लग्न लावून देण्यात आले. तिला पुढे शिकण्याची इच्छा होती. परंतु तिला शिकू देण्यात आले नाही. 18 व्या वर्षी तिला मुलं झाले. पतीने तिला तोंडी तलाक दिला. याने खचून गेलेल्या आर्शियाला एक नवं आयुष्य सुरु करण्यात मंडळाने मदत केली. तिला शिक्षणाची प्रेरणा दिली. आज आर्थियाने 12 वी पूर्ण केली असून तिला वकील व्हायचे आहे. अमिन शेख या हलाखिच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या तरुणाला दत्तक घेत त्याला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर मंडळाने उभे केले. आज अमिन शेख हे एका प्रतिष्ठित महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अश्या शेकडो कहाण्या तांबोळी यांच्याकडे आहेत. मुस्लिम तरुणांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करावेत यासाठी तांबोळी प्रोत्साहन देतात. त्याचबरोबर मंडळाकडून त्यांना संरक्षण देण्याचं कामही ते करत असतात. मुस्लिम समाजाला त्यांच्या अनिष्ठ परंपरांच्या जोखडातून मुक्त करुन एका नवीन धर्मनिरपेक्ष, शिक्षित समाज घडविण्यासाठी तांबोळी आणि त्यांचे सहकारी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून चळवळ चालवित आहेत. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला, कडाडून विरोध होत असला तरी सत्यशोधनाची ही चळवळ अविरत चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांचे हे कार्य अनेक मुस्लिम तरुणांना प्रेरणा देत आहेत. 

Web Title: Maharashtra Day shamsuddin tamboli working for muslim communities welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.