Maharashtra Day: महाराष्ट्राबद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:24 AM2019-05-01T09:24:51+5:302019-05-01T09:29:10+5:30
'या' रंजक गोष्टी वाचून तुम्हाला महाराष्ट्राविषयी वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल
महाराष्ट्र.. संतांनी सहिष्णूतेची बीजं पेरलेला, समाज सुधारकांनी विचारांची मशागत केलेला, साहित्यिकांनी समृद्ध केलेला, असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र.. काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला.. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख.. त्यामुळेच महाराष्ट्र जगला, तर देश जगेल, असं म्हटलं जातं त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.. याच महाराष्ट्राबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.. यामुळे तुम्हाला महाराष्ट्राविषयीचा वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल..
1. लोणार सरोवर- देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हेवा वाटावं असं लोणार सरोवर महाराष्ट्रात आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर जगभरातील लोकांसाठी हे सरोवर कुतूहलाचा विषय आहे. लोणार सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. बेसॉल्ट खडकातील हे एकमेव मोठं आघाती विवर आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरं आहेत. त्यातील १५ मंदिरं विवरातच आहेत. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केलंय.
2. शनीशिंगणापूरातील दरवाजा नसलेली घरं- सध्या सर्वांनाच सुरक्षेची चिंता भेडसावते. मात्र महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथल्या घरांना दरवाजेच नाहीत. हे गाव म्हणजे शनीशिंगणापूर. एकीकडे लोक त्यांचे पैसे, दागिने सांभाळून लॉकरमध्ये ठेवतात. मात्र अहमदनगरमधल्या शनीशिंगणापूरमधील घरांना दरवाजेच नाहीत. कारण शनीशिंगणापूरमधील घरांचं संरक्षण खुद्द शनीदेव करतात, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.
3. देशातील पहिली रेल्वे- महाराष्ट्राला देशाच्या विकासाचं इंजिन समजलं होतं. देशाच्या विकासाचं इंजिन असलेल्या याच महाराष्ट्रात धावली देशातली पहिली रेल्वे. स्वातंत्र्यपूर्व भारतात 16 एप्रिल 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे धावली. आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या दरम्यान ही रेल्वे धावली. दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी धावलेल्या या ट्रेननं 34 किलोमीटर अंतर पार केलं.
4. जगातलं सर्वात मोठं नियोजित शहर- मुंबईवरील लोकसंख्येचा भार वाढू लागला आणि नवी मुंबईचा जन्म झाला. मात्र मुंबईच्या नियोजनात झालेल्या चुका नवी मुंबईची उभारणी करताना काटेकोरपणे टाळण्यात आल्या. 1972 मध्ये विकसित झालेली नवी मुंबई हे जगातलं सर्वात मोठं नियोजित शहर आहे.
5. देशातलं सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं- देशातलं सर्वात मोठं रस्त्यांचं जाळं महाराष्ट्रात आहे. यामुळेच महाराष्ट्र कायम उद्योग, व्यापार आणि व्यवसायात अग्रेसर राहिला. महाराष्ट्रात तब्बल पावणे तीन लाख किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते आहेत. देशातल्या कोणत्याच राज्यात इतकं मोठं रस्त्यांचं जाळं नाही.
6. क्षेत्रफळात 'महा'राष्ट्र- महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि भौगोलिक स्थान ही राज्याची सर्वात मोठी जमेची बाजू. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. राकट आणि कणखर देश अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचं आकारमान भूतान, फिजी, कतार, ओमान, आर्यलँड, कुवेत, पनामा या देशांपेक्षाही जास्त आहे. युरोप खंडातले अनेक देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहेत.
7. औद्योगिक उत्पादन: महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात कायमच अग्रस्थानी राहिलाय. त्यामुळे परदेशातून येणारी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होते. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रात देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या 24 टक्के उत्पादन होतं.
8. संपन्न महाराष्ट्र- देशातलं सर्वात विकसित आणि संपन्न राज्य ही महाराष्ट्राची ओळख. अनेक आर्थिक अहवाल आणि मापदंडांवरुन हे सिद्धदेखील झालंय. देशात सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि सर्वात श्रीमंत राज्य म्हणजेदेखील महाराष्ट्रच.
9. उद्योगांचं माहेरघर- अनेक मोठ्या उद्योगांनी बाळसं धरलं ते महाराष्ट्रातच. आज भल्यामोठ्या वटवृक्षात रुपांतरित झालेल्या उद्योगांची बीजं महाराष्ट्रात रोवली गेली. टाटा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स उद्योग, गोदरेज, किर्लोस्कर ब्रदर्स, एस्सार, बजाज आणि असे अनेक उद्योग महाराष्ट्रात जन्माला आले आणि आज त्यांनी संपूर्ण जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय.
10. अर्थकारणाचं केंद्र- देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक प्रख्यात आणि महत्त्वाच्या वित्तीय संस्था महाराष्ट्रात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि सेबी यांची कार्यालयं मुंबईत आहेत.