उपचारापुरताच महाराष्ट्र दिन !
By admin | Published: May 3, 2015 12:25 AM2015-05-03T00:25:35+5:302015-05-03T00:25:35+5:30
नुकताच महाराष्ट्र दिन होऊन गेला. या दिवसाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष मराठीबद्दल काही ना काही घोषणा करीत असतात.
डॉ. दीपक पवार -
नुकताच महाराष्ट्र दिन होऊन गेला. या दिवसाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष मराठीबद्दल काही ना काही घोषणा करीत असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. फेसबुक - टिष्ट्वटर यासारखी माध्यमे लोकप्रिय झाल्यानंतर ‘महाराष्ट्र दिन आहे की दीन’ अशा प्रकारचे सचित्र विनोदही प्रसिद्ध होताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेल्या लोकांनी १ मे रोजी कामगार दिनही आहे, हे लक्षात घेऊन त्याच दिवशी महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, असा आग्रह धरला. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा कणा असलेला हा कामगार ह्या राज्यात दूरवर फेकला गेला आहे.
ज्या बहुजनांच्या विकासाचं स्वप्न अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर यांनी पाहिले आणि डफावर थाप मारून समोरच्या भारलेल्या जनतेपुढे मांडलं, त्या बहुजनांचं परिघीकरण झालं आहे. सत्तेचे आणि भांडवलदारांचे दलाल जागोजागची मचानं हेरून नेम धरून टपून बसले आहेत. श्रीमंतांना हवं असं शहर, राज्य उभारण्यासाठी २४* ७ काम चालू आहे. जवळपास सगळी प्रसारमाध्यमे याच कामाला जुंपलेली आहेत. अपवाद असतीलही, पण ते नियम सिद्ध करण्यापुरतेच आहेत. आपण सगळ््यांनी मिळून जे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले, त्याची आता काय स्थिती आहे? मुंबई शहर पुरतं भांडवलदारांच्या घशात गेलं आहे. तीच अवस्था इतर महानगरांची आणि जिल्ह्यांच्या शहरांची आहे. रावणाला जशी दहा तोंडं तशी आमच्या राजकीय वर्गालाही आहेत. त्यातले काही चेहरे बिल्डर, विकासक यांचे आहेत. याशिवाय साखरसम्राटांपासून दूधसम्राटांपर्यंत इतर सगळे पारंपरिक चेहरे आहेतच. सगळ््यांची तालुक्यापासून राज्यापर्यंत संस्थाने आहेत. त्याचा अधिकृत-अनधिकृत काळा-पांढरा व्यवहार आहे. त्यानी उपकृत केलेल्या माणसांच्या फौजा आहेत. मध्ययुगात असलेल्या भाटचारणांप्रमाणे आजच्या युगातही भाटचारण आहेत. त्याला काधी जनसंपर्काचं तर कधी लाइझनिंगचं नाव आहे. कधी कधी आध्यात्मिक गुरूही ते काम दाम घेऊन करू लागलेत.
मंत्रालयात, विधान भवनात मंत्र्यांच्या निवासस्थानाशी लागलेल्या रांगा, दलाल आणि मध्यस्थांची चिठ्ठ्याचपाट्यांची देवाणघेवाण आणि रात्री उशिरा होणारी पेटी - खोक्यांची देवाणघेवाण हे समकालीन महाराष्ट्राचे दागिने आहेत! एखाद्या माणसाला अॅलर्जी होऊन त्याचं अंग फोडांनी भरून जावं तसा महाराष्ट्राचा नकाशा सद्गुण आणि विवेकाच्या अॅलर्जीने भरून गेला आहे. म्हणूनच या राज्यात कॉ़ पानसरे, डॉ़ नरेंद्र दाभोळकरांसाख्या विवेकी लोकांना जागा नसते. पण गल्लोगल्लीच्या बाबा-बापूंना मात्र रस्ते अडवून जागा मिळतात. असं राज्य महान लोकांचं राष्ट्र असं मानणं हा गंभीर गुन्हा मानला पाहिजे. मध्यंतरी परेश मोकाशींचा एलिझाबेथ एकादशीसारखा नितांत सुंदर सिनेमा आला. त्यात राणी एलिझाबेथचा उल्लेख आला म्हणून त्या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांनी केली. विठ्ठलाशी नातं सांगणाऱ्या लोकांनी इतका अडाणीपणा करावा आणि त्यांना महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी एका शब्दानेही बोलू नये, हे लाजिरवाणं आहे.
दुसरीकडे जातीअंताची धुरा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या मंडळींमध्ये जात इतकी खोलवर भिनली आहे, की आता त्यांची प्रमाणपत्रं घेतल्याशिवाय तुम्ही पुरोगामी आहात का हे तुम्हाला सिद्ध करता येत नाही. अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींप्रमाण दुर्मीळ होऊ पाहणारे समाजवादी इतकी अस्पृश्यता पाळतात, की मनुवाद्यांनीही त्यांचं अनुकरण करावं. ही सगळी माणसं समकालीन महाराष्ट्रात आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात. मग महाराष्ट्र मोठा कसा होईल? ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले’ असं सेनापती बापटांनी म्हटले हाते आणि ते आजही आपण मिरवतो. पण कर्तृत्व, संवेदनशीलता आणि विवेक या तीनही आघाड्यांवर महाराष्ट्र मेला तर नाही ना, असा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. गेल्या ५० वर्षांत आपण ज्ञाननिर्मिती केली का, विचारांच्या नव्या दिशा शोधल्या का, महाराष्ट्राच्या सामूहिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी निष्ठेने झटलो का, या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही उत्तरं देण्यासाठी आपण जितका वेळ लावू तितका महाराष्ट्र दिन हा उपचार होऊन बसेल; तसा तो आताही उपचार झालेला आहेच!