उत्तर प्रदेशात प्रथमच साजरा होणार महाराष्ट्र दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 07:21 PM2017-04-25T19:21:30+5:302017-04-25T19:21:44+5:30

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी दि. १ मेरोजी मराठी अस्मितेचा झेंडा उत्तर प्रदेशच्या राजभवनातही फडकणार

Maharashtra Day will be celebrated for the first time in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात प्रथमच साजरा होणार महाराष्ट्र दिन

उत्तर प्रदेशात प्रथमच साजरा होणार महाराष्ट्र दिन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
विटा (जि. सांगली), दि. 25 - महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनी १ मे रोजी मराठी अस्मितेचा झेंडा उत्तर प्रदेशच्या राजभवनातही फडकणार आहे. व्यवसायानिमित्त तेथे स्थायिक झालेल्या गलाई बांधवांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली लखनौ येथे प्रथमच महाराष्ट्राचा गौरव होणार असून या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असणार आहे.
सांगली, सातारा जिल्ह्यातील सोने-चांदी गलाई व्यवसाय बांधवांनी उत्तर प्रदेशमध्ये स्थायिक होऊन उमेशअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मंडळाची स्थापना केली आहे. देश व विदेशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन गलाई बांधवांनी मराठी अस्मिता जोपासत महाराष्ट्राची शान आणि मान कायम ठेवली आहे. दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, उत्तर प्रदेशमध्येही महाराष्ट्राच्या अस्मितेचा झेंडा फडकविण्याचा निर्णय तेथील गलाई बांधवांनी घेतला आहे. दि. १ व २ मे रोजी लखनौ येथील राजभवनाच्या प्रांगणात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मंत्रिमंडळातील सदस्य रिता बहुगुणा जोशी, बृजेश पाठक, आशुतोष टंडन, श्रीमती स्वाती सिंह, मोहसीन रजा उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सुप्रसिद्ध संगीतकार, गायक श्रीधर फडके यांची मैफील आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रदिनी मराठी अस्मितेचा झेंडा उत्तर प्रदेशच्या लखनौ या राजधानीत फडकणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या मराठी लोकांनी मराठा समाज मंडळाची स्थापना केली आहे. दि. १ मेरोजी उत्तर प्रदेशमध्येही मराठी अस्मिता जोपासण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत लखनौ येथील राजभवन प्रांगणात कार्यक्रम होणार आहे.
- प्रदीप कदम, विटा, जिल्हाध्यक्ष, मराठा समाज मंडळ, मिर्जापूर (उत्तर प्रदेश)

Web Title: Maharashtra Day will be celebrated for the first time in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.