राज्याचे DGP ठाकरे सरकारवर नाराज, केंद्राच्या सेवेत जाणार; असं आहे संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:44 PM2020-11-06T14:44:57+5:302020-11-06T14:52:16+5:30
सुबोध जैस्वाल हे केंद्र सरकारमधूनच मुंबईत आले होते. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता.
नवी दिल्ली -महाराष्ट्राचे (Maharashtra) डीजीपी (DGP) सुबोध जैस्वाल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यात जवळपास 50 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यानंतर कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीपींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे नाराज डीजीपी सुबोध जैस्वाल यांनी महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. RAWमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या सुबोध जैस्वाल यांना नॅशनल सिक्योरिटी गार्ड अर्थात NSGचे डीजी म्हणून पोस्टिंग मिळू शकते.
सुबोध जैस्वाल हे केंद्र सरकारमधूनच मुंबईत आले होते. तीन वर्षांपूर्वी ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांना बढती मिळाली आणि ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. सरकार आणि सुबोध जैस्वाल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बदल्या झाल्या. यावेळी, त्या बदल्या आपण होऊ देणार नाही, असा पवित्रा जैस्वाल यांनी घेतला होता. मात्र, आता, राज्य सरकारसोबत पटत नसल्याने त्यांनी पुन्हा केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल केंद्रात गेल्यानंतर राज्यातील पोलीस महासंचालकपद रिक्त होणार आहे.