महाराष्ट्रातून वर्षभरात तब्बल ४९ हजार महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:26 AM2017-12-01T06:26:25+5:302017-12-01T06:26:48+5:30
महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ महिला गायब होण्यामागे महाराष्ट्र दुसºया क्रमांकावर असणे ही चिंतेची बाब आहे.
देशभरातून गेल्या वर्षभरात ५ लाख ४९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २ लाख २९ हजार ३८१ नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले. तर अजूनही ३ लाख १९ हजार नागरिक बेपत्ताच्या यादीत आहेत. यामध्ये १ लाख ७४ हजार ८१६ महिलांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे बेपत्ता होण्याच्या घटनांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातून ९४ हजार ९१९ लोक गायब झाले आहेत. पश्चिम बंगालपाठोपाठ पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातून ४९ हजार ३३८ महिला बेपत्ता झाल्या आहेत.
हेतूपूर्वक अत्याचारातही आघाडी कायम
हेतूपूर्वक करण्यात आलेल्या महिलांवरील हल्ल्यांमध्येही महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. राज्यात तब्बल ११ हजार ३९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आहे. या गुन्ह्यांच्या बरोबरीने ६४ हजार ५१९ जणींचे अपहरण झाल्याची नोंद आहे.
अपहरणाच्या गुन्ह्यांत दुसºया तर बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. अशात राज्यातून ६ हजार १७० जणींचे अपहरण झाले आहे. तर ४१८९ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांचाही समावेश आहे.
चिंतेची बाब
पश्चिम बंगालमधून ५३ हजार ६५४ महिला बेपत्ता आहेत. पश्चिम बंगालमधून अनेकदा नोकरीच्या बहाण्याने महिलांना मुंबईसह राज्याच्या विविध भागांत वेश्याव्यवसायात अडकविले जात असल्यामुळे त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी परिस्थिती असताना पश्चिम बंगालपाठोपाठ राज्यातूनही महिला गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक असणे चिंतेची बाब ठरत आहे.
काही महिला प्रेमभंग, पूर्ववैमनस्य, आॅनर किलिंग, एकतर्फी प्रेमाच्या शिकार ठरतात. अनेकदा त्यांची हत्या होते. मात्र मृतदेह सापडत नाहीत. काही जणी स्वत:हून पळून जातात, भवितव्य घडविण्यासाठी, नोकरीच्या शोधात अनेक जणी घर सोडतात. असे विविध पैलू या बेपत्ता होण्यामागे असतात.
- प्रवीण दीक्षित
माजी पोलीस महासंचालक