Maharashtra Cabinet Expansion : भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?, गुजरात पॅटर्नची दिग्गजांना धडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:00 AM2022-08-03T10:00:13+5:302022-08-03T10:16:50+5:30
मंत्रिपदासाठी आता नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे. वाचा कोणाच्या नावांची आहे चर्चा.
मुंबई - सरकार स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र अद्यापही झाला नाहीये. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात दिग्गजांचा पत्ता कापून भाजपकडून नव्यांना संधी दिली जाणार असल्याच्या वृत्ताने अनेकांना धडकी भरली आहे. मंत्रिपदासाठी आता नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा होत आहे.
मुंबईतून आशिष शेलार, अतुल भातखळकर आणि राम कदम यांची नावे समोर आली आहेत. ठाणे जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण, वर्धेचे समीर कुणावार, अकोल्याचे रणधीर सावरकर, वाशिमचे राजेंद्र पाटणी, नंदूरबारचे डॉ.विजयकुमार गावित, अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील, जालना जिल्ह्यातील नारायण कुचे, नागपूरचे प्रवीण दटके, नाशिकच्या देवयानी फरांदे, चंद्रपूरचे बंटी भांगडिया, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, पुण्याच्या माधुरी मिसाळ अशा नावांची जोरदार चर्चा होत आहे. मंत्रिमंडळाला नवीन चेहरा देण्याचा भाजपच्या श्रेष्ठींचा आग्रह असल्याने या नावांना बळ आले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन, जयकुमार रावल, संभाजी पाटील निलंगेकर, डॉ.संजय कुटे, बबनराव लोणीकर,सुभाष देशमुख, गिरीश महाजन, जयकुमार रावल, विजय देशमुख या अनुभवी नेत्यांना संधी मिळणार की नाही या बाबत अनिश्चितता आहे. मदन येरावार, परिणय फुके, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हेही अनिश्चिततेच्या झुल्यावर आहेत. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना संधी देताना प्रदेशाध्यक्ष अन्य व्यक्तीकडे देण्याची अट असेल असे मानले जाते. बहुतांश चेहरे नवीन दिले तर सरकारची घडी बसवून गतिमान कारभार देणे कठीण जाईल, असे सांगत अनुभवी लोकांना संधी देत जुन्या-नव्यांचे संतुलन साधावे असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असल्याचे म्हटले जाते. त्या बाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही न होणे हे मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळा निकाल दिला तर भाजप-शिंदे यांच्याकडून विधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्यपालांकडे लगेच नावे पाठवायची आणि नियुक्त्या करवून घ्यायच्या अशीही रणनीती असल्याची खात्रीलायक माहिती आहे.