Maharashtra Election 2019 : राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना पाच वर्षांत १५ हजार कोटींची कर्जमाफी : स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:47 PM2019-10-15T13:47:19+5:302019-10-15T13:52:04+5:30
मागील पाच वर्षांत ६५ हजार शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल झाल्या आहेत.
इंंदापूर : ‘‘जर जनतेने राष्ट्रवादी व काँग्रेसला मतदान केले तर पदरात काहीही पडणार नाही. भाजपला मतदान करून लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना पाच वर्षांत ५० लाख शेतकऱ्यांना १५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी भाजप सरकारने करून दिली आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे आयोजित जाहीर सभेत केंद्रीयमंत्री इराणी बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, की भारत देशात लोडशेडिंग नाही, वीज जात नाही. त्यामुळे मुबलक वीजपुरवठा होत असल्याने जीवनातील अंधार संपुष्टात आला आहे. रोजगार मिळण्यासाठी राज्यात पहिली गरज वीज आहे, त्यानंतर शिक्षण आहे. मागील पाच वर्षांत ६५ हजार शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल झाल्या आहेत. हा सन्मान फक्त भाजप सरकारचा आहे.
........
राष्ट्रवादी व्हेंटिलेटरवर
राज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले, की हर्षवर्धन पाटलांबद्दल तसा मला रागच आहे, याचे कारण असे आहे, की लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मी पाच फोन केले होते. मात्र, त्यांनी ‘रिस्पॉन्स’ दिला नाही. त्या कालावधीत जर हर्षवर्धन पाटील भाजपकडे आले असते, तर लोकसभेचा निकाल वेगळा लागला असता. मोदी सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, काँग्रेस पक्षाची वाईट अवस्था झाली आहे. सभा करायला काँग्रेसचा एकही नेता राहिलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटका मोजत आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.