आता अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 01:59 PM2019-11-10T13:59:12+5:302019-11-10T14:13:35+5:30

बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Election 2019 Abhijeet Bichukle letter to mlas for government formation | आता अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

आता अभिजीत बिचुकले राज्यपालांकडे करणार सत्ता स्थापनेचा दावा

Next
ठळक मुद्देबिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन बिचुकले यांनी केले.येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई - विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. यानंतर आता बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन बिचुकले यांनी केले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं बिचुकले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

'मी स्वत: गेली 20 वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणास माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन 2004, 2009, 2014 आणि 2019 अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक 2019 साठी मी 182 वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली' असल्याचं बिचुकले यांनी पत्रात म्हटलं आहे. 

अभिजीत बिचुकले यांनी 'या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरू, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत: चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे हे तुम्हाला माहीत असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत मा.राज्यपाल, महाराष्ट्र यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे' असं देखील बिचुकले यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबईतील वरळी मतदारसंघाच्या निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्याचवेळी बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिलं होतं. भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी आली आहे. भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. 

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज जयपूरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांमध्ये एकमत झाले. या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमती दर्शवली. मात्र सद्यस्थितीत याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2019 Abhijeet Bichukle letter to mlas for government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.