Maharashtra Election 2019: अमृता फडणवीसांकडून राज ठाकरेंची खिल्ली तर उद्धव ठाकरेंना 'ही' उपमा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 09:26 PM2019-10-13T21:26:14+5:302019-10-13T21:31:05+5:30
Maharashtra Election 2019: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपात राजकीय वॉर रंगलं आहे
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा अमृता यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे. यापूर्वी अंग्रिया क्रुझच्या उद्घाटनप्रसंगी सेल्फी काढलेला अमृता फडणवीस यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तर काही दिवसांपूर्वी अमृता यांच्या गाण्याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनसेचं गाणं गाताना व्हिडिओत त्या दिसत होत्या. पण, तो एडिट करुन फेक व्हिडिओ बनविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करुन राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर अमृता यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस चक्क मुख्यमंत्र्यांसमोर मनसेचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ आहे. मनसे आणि भाजपा हे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. अमृता फडणवीस यांचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला होता.
अमृता फडणवीस यांना एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमधील रॅपिड फायर राऊंडमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये, राज ठाकरेंबद्दल एका वाक्यात काय सांगाल असे विचारण्यात आले. त्यावर, त्यांना हे वाईट वाटेल, पण विचारलंय म्हणून सांगते... एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट... असे अमृता यांनी म्हटलंय. तर, उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना 'बडे भैय्या', असं त्या म्हणाल्या.
शरद पवारांबद्दल बोलताना, मला त्यांचा खूप आदर आहे. या वयातही ते ज्या पद्धतीने पळतात ते पाहून मी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन.... अभी तो मै जवान हूँ... असे अमृता यांनी म्हटले आहे. तसेच, पती देवेंद्र यांच्याबद्दल सांगताना, घरातून गायब असलेले मिस्टर इंडिया, असे विनोदी उत्तर त्यांनी दिले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपात राजकीय वॉर रंगलं आहे. भाजपाने रम्याचा डोस या काल्पनिक पात्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. कोहिनूर मिल कथित घोटाळ्यात ईडीची चौकशी झाल्याचा उल्लेख करत भाजपाने राज ठाकरेंना कोट्याधीश जादूगर अशी उपमा दिली होती. तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही पीएमसी बँकेबाबत सामान्यांना त्रास झाल्याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एक्सिस बँकेत खातं उघडावं, आपली बँक, वहिनीची बँक असं म्हणत भाजपावर पलटवार केला आहे.