Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत ४ हजार कोटी खर्च होणार!
By अतुल कुलकर्णी | Published: October 9, 2019 04:36 AM2019-10-09T04:36:35+5:302019-10-09T04:37:14+5:30
सरकारी यंत्रणेवर होणारा सुमारे ७०० ते आठशे कोटी रुपयांचा खर्च वेगळाच.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : विधानसभेच्या २८८ जागांसाठी ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रत्येक उमेदवाराला अधिकृतपणे २८ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. एकूण उमेदवार आणि खर्च लक्षात घेतला तर या निवडणुकीत अवघ्या १५ दिवसात तब्बल ९०६ कोटी ९२ लाख रुपये खर्च होतील. या शिवाय, बेहिशेबी सरासरी १ कोटी धरले तर सुमारे ४ हजार कोटी खर्च होतील. सरकारी यंत्रणेवर होणारा सुमारे ७०० ते आठशे कोटी रुपयांचा खर्च वेगळाच.
निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने खर्चावर मर्यादा आणली असली तरी त्यातून पळवाट काढली जाते. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगल्या सोसायटीमधल्या मतदारांनी आमच्या सोसायटीला रंग लावून द्या इथपासून ते आमच्या सोसायटीचे पाच वर्षाचे केबलचे बील भरा, अशा मागण्या केल्याचे त्यावेळी समोर होते. निवडणूक काळात कोट्यवधी रुपये पकडले जातात. एका मतदारसंघात काही उमेदवार सुमारे २ कोटी ते ८ कोटी रुपये खर्च करतात. मात्र किमान १ कोटीचा खर्च एका उमेदवाराने केला असे गृहीत धरले तरीही ३२३९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. राजकीय पक्षांना खर्चाचे कसलेही बंधन नाही. उमेदवारांना त्यांचा खर्च त्यांच्या विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो तर राजकीय पक्षांना त्यांचा खर्च केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सादर करावा लागतो. त्या खर्चावर बंधन नसल्यामुळे राजकीय पक्षांचे विमान प्रवास, मोठ्या नेत्यांच्या व्यासपीठासाठीची स्टेज व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यासाठीचे खर्च उमेदवारांकडे नसतात. ते खर्च पक्षाच्या खात्यात जातात.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या वतीने जवळपास १७ ते १९ हेलिकॉप्टर आणि १३ ते १४ विमाने वापरली जाणार आहेत. एका व्हीआयपी हेलिकॉप्टरचा खर्च दोन कोटींच्या आसपास येतो तर विमानाचा खर्च अडीच कोटीच्या घरात जातो. हा हिशोब पाहिला तर या हवाई प्रवासावर ५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. शिवाय प्रचारासाठी वापरल्या जाणाºया गाड्या, त्यांचे पेट्रोल, डिझेल हा सगळा खर्च गृहीत धरला तर तोही जवळपास तेवढाच होईल.
भारतात राजकीय प्रचारासाठी हवाई वाहने वापराची पद्धत जास्त आहे. गेल्यावेळीपेक्षा यावेळी मागणी कमी आहे. दिवसाला पाच, सहा रॅलीज असल्या तर ही गरज वाढते. पण तशी मागणी अजून तरी दिसत नाही.
- मंदार भारदे, एमडी,
मॅब एव्हीएशन