महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा-शिवसेनेत अजूनही फोनाफोनी सुरूच?; उद्धव ठाकरेंनी सांगितले हळूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 09:11 PM2019-11-12T21:11:20+5:302019-11-12T21:13:25+5:30
शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी 48 तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी थेट सहा महिन्यांचीच मुदत दिली, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या भुमिकेवर टीका केली. यावेळी त्यांनी भाजपाचा मोठा आरोपही खोडून काढला. काँग्रेस राष्ट्रवादीशी कधी संपर्क केल्याचे त्यांनीच सांगितले यामुळे भाजपाचा आरोप खोटा असल्याचे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी 48 तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी थेट सहा महिन्यांचीच मुदत दिली. त्यामुळे महाराष्ट्राला एवढा दयावान माणूस लाभला तर राज्याचं भलं होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोमणा देखील लगावला आहे.
यावेळी पत्रकारांनी मित्राकडून संपर्क केला जातोय का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी काहीसे होकारार्थीच उत्तर दिले. दरवेळी संपर्कात जर नवनवीन गोष्टी ठरवल्या जाणार असतील तर अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच हिंदुत्वामध्ये वचनबद्धता हे महत्त्वाचं कलम आहे. आम्हाला राम मंदिर हवं, पण प्रभू रामचंद्र जसे सत्यवचनी होते, तसं वचन पाळायचं नसेल तर या हिंदुत्वाला अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला उल्लू बनवत आहेत; नारायण राणेंचा टोला
सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल कोणती भूमिका घेणार हे आजही ठरलेलं नाही. त्यामुळे एनडीएनतून बाहेर पडलेली शिवसेना अद्याप वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला ‘वेटिंग’वर ठेवलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.