महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 09:59 PM2019-11-11T21:59:24+5:302019-11-11T22:00:47+5:30
हॉटेलमधील आमदारांच्या मुक्कामावरुन शिवसेनेला भाजपाचा टोला
मुंबई: मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरलेल्या आणि त्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला आता भाजपानं टोला हाणला आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र २४ तासांत त्यांना राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आलं. आपले आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेनं बरीच काळजी घेतली होती. शिवसेनेनं त्यांच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. यावरुन आता भाजपानं शिवसेनेला चिमटा काढला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं 'रम्याचे डोसे' ही व्यंगचित्र मालिका सुरू केली. यामधून भाजपानं काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. मात्र आता 'रम्याचे डोस'मधून शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये एकजण रम्याला 'विश्वास म्हणजे काय रे भाऊ?' असा प्रश्न विचारतो. त्यावर '105 आमदारांना मोकळे सोडणे याला विश्वास म्हणतात,' असं उत्तर रम्यानं दिलं आहे. शिवसेनेला 56 आमदार सांभाळावे लागतात. ते फुटतील याची त्यांना भीती वाटते. मात्र भाजपानं त्यांच्या सर्व आमदारांना मोकळं सोडलं आहे. कारण ते फुटणार नाहीत, याचा पक्षाला विश्वास असल्याचा अप्रत्यक्ष टोला रम्याचे डोसमधून लगावण्यात आला आहे.
याला म्हणतात विश्वास!!#रम्याचेडोसpic.twitter.com/38LSUwcaoG
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 11, 2019
शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना नेतृत्त्वानं सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व आमदारांचा मुक्काम हॉटेल रिट्रीटमध्ये हलवण्यात आला. शिवसेनेचे अनेक आमदार आत्ताही हॉटेल रिट्रिटमध्येच आहेत.