महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मोठा राहिलेलो नाही- खडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:06 PM2019-11-06T16:06:58+5:302019-11-06T16:13:26+5:30
शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला न ठरल्यानं सरकार स्थापनेचा तिढा कायम
शिर्डी: पाच वर्षांपूर्वी शिवसेना, भाजपाची युती तुटल्याची घोषणा करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून काहीसे लांब आहेत. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर गेलेले खडसे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. त्यावेळी त्यांना शिवसेना, भाजपामध्ये सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही असं म्हणत खडसे यांनी त्यांच्या मनातली खंत अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे राजकारणापासून चार हात लांब राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपानं एकनाथ खडसेंना तिकीट नाकारलं. यानंतर खडसे समर्थकांची नाराजी समोर आल्यावर पक्षानं त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. मतदारसंघात रोहिणी खडसे विरुद्ध इतर सर्व असा सामना झाल्यामुळेच हा पराभव झाल्याचं खडसेंनी निकालानंतर म्हटलं होतं.
निवडणुकीचा निकाल काहीही लागो, मी कायम शिर्डीत बाबांच्या दर्शनाला येतो, असं खडसेंनी सांगितलं. 'दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काय ठरलं याची मला कल्पना नाही. त्यामुळे याबद्दल मी फारसं भाष्य करू शकत नाही. मात्र शिवसेनेची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं', असं म्हणत त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपावर बॅकफूटवर आली आहे का या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. भाजपा बॅकफूटवर आलेली नाही. तणाव वाढवायचा नसल्यानं त्यांच्याकडून शांतपणे चर्चा सुरू आहे. युती तुटू नये आणि महायुतीचं सरकार स्थापन व्हावं या भावनेनं भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाला राज्यात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचं ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचं सरकार येईल का, अशा जर-तरच्या प्रश्नांना अर्थ नसल्याचंदेखील ते पुढे म्हणाले.