महाराष्ट्र विधानसभा 2019: राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही- मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 01:16 PM2019-11-07T13:16:51+5:302019-11-07T13:20:25+5:30
राज्यात महायुतीचं सरकार येईल; मुनगंटीवारांना विश्वास
मुंबई: शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपाचा प्रश्न सुटत नसल्यानं सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत दररोज भाजपावर टीकेचे बाण सोडत असल्यानं महायुतीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील दरी वाढली आहे. अर्थमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. राऊत यांनी केलेल्या काही आरोपांना मुनगंटीवार यांनी उत्तरं दिली. मात्र एका क्षणी राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाकडून केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना कुणीही अशा पद्धतीनं आमदारांचा अवमान करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. लाखो मतदारांच्या आशीर्वादानं जो निवडून येतो, त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्द काढणं योग्य नाही, असं मुनगंटीवारांनी म्हटलं. शिवसेनेचे आमदार कधीही फुटणार नाहीत. कारण त्यांची पक्षावर निष्ठा आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं.
राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत नेहमीप्रमाणे भाजपावर तोफ डागली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्यासाठी शिवसेना कारणीभूत नसेल. कारण सर्वात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेची जबाबदारी भाजपाची आहे. राज्यात निर्माण झालेल्या तिढ्याला आम्ही जबाबदार नाही, असं राऊत म्हणाले. त्याबद्दल मुनगंटीवारांना विचारलं असता, राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांनी प्रश्नपत्रिका काढायची आणि आम्ही उत्तरं लिहित बसायची, असं होणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या शिवसेनेनं त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं समजावं, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मित्रपक्षाची समजूत काढण्याचादेखील प्रयत्न केला. उद्धव ठाकरे देवेंद्रजींना शिवसैनिकच समजतात. देवेंद्रजी शिवसैनिक आहेत, हे उद्धव ठाकरेच म्हणालेत. त्यामुळे देवेंद्रजींच्या रूपानं शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल, हेच आम्ही सांगतोय. मग अडचण कुठे आहे?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.