महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री'तील बंद खोलीत नेमकं काय झालं?; अमित शहांनी 'संस्कारां'वर बोट ठेवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:15 PM2019-11-13T22:15:10+5:302019-11-13T22:16:57+5:30
उद्धव ठाकरेंवर अमित शहांचा पलटवार; शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर भाष्य
मुंबई: राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना त्यावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा बोलत का नाहीत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर अमित शहांनी सत्ता संघर्षावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. मात्र असा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आलेला नव्हता, असं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं.
मुख्यमंत्रिपदाबद्दलचा शब्द दिलाच नाही असं म्हणून देवेंद्र फडणवीस शब्द फिरवत आहेत. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे, असा दावा उद्धव यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत केला होता. त्यावेळी त्यांनी अमित शहांसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. त्यावर बंद दाराआड झालेली चर्चा जाहीर करणं, उघड करणं हे आमच्या पक्षाच्या संस्कारात बसत नाही, असा टोला शहांनी लगावला. खोटं बोलणं मला पटत नाही. बाळासाहेबांचे तसे माझ्यावर संस्कार नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर शहांनी पलटवार केला.
मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकांवेळी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला होता. देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री होतील, असं आम्ही जाहीरपणे म्हटलं होतं. मग त्यावेळी कोणीही त्याबद्दल आक्षेप का नोंदवला नाही, असा प्रश्न शहांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यावेळी काहीच न बोलणारे आता नव्या मागण्या घेऊन येत आहेत. मात्र त्या आम्हाला अमान्य आहेत, असं शहा म्हणाले आहेत. त्यामुळे युतीमध्ये निर्माण झालेली दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे.