Maharashtra Election 2019: आगामी मुख्यमंत्री एकट्या भाजपाचा नसेल; एकनाथ खडसेंनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:53 AM2019-10-17T11:53:37+5:302019-10-17T11:54:30+5:30
विधानसभा निवडणूक २०१९ - प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असते तर राजकारण वेगळ्या दिशेला असतं
जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. २०१४ च्या निवडणुकीत युती तोडली नसती तर भाजपाचा एकट्याचा मुख्यमंत्री दिसला नसता. येणारा मुख्यमंत्री भाजपाचा नसेल तर युतीचा असणार आहे असं भाजपा नेते एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, मी कधीच संपणार नाही, मला जनतेची साथ आहे, जनतेची प्रेम आहे, गेली ४०-४५ वर्ष मी पक्षासाठी काम केलं माझी इच्छा होती मला निवडणुकीची संधी द्यावी पण पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. पण इतकी वर्ष काम करुन पक्षाने अन्याय का केला? याचं उत्तर मिळत नाही तोवर मी पक्षाला हे विचारत राहणार आहे असंही त्यांनी सांगितले.
शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल केला तो सरकारने केला नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशावर केला आहे. शरद पवारांनी इतके पक्ष बदलले हा त्यांचा इतिहास आहे. मी वस्तूस्थिती आहे ते बोलतो, मला जे वाटतं ते बोलतं. मला सत्तेची लालसा नाही. भाजपामध्ये जे विरोधक आहेत त्यांच्याबाबत पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सांगितलं आहे. मी पक्षाविरोधात बोलणार नाही जे काही असेल पक्षप्रमुखांशी बोलेन असं एकनाथ खडसेंनी सांगितले.
तसेच कोणतंही विकासकाम करायला वेळ लागतो, सहापदरी रोडवर बनायला वेळ लागतोच. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. विलंब होत असेल पण विकास नक्कीच सुरु झाला आहे. कलम ३७० देशाशी निगडीत कलम आहे. माझं घर सुरक्षित राहावं, जिल्हा सुरक्षित राहावं असे संकुचित विचार करणाऱ्यांना कलम ३७० चं महत्व काय कळणार? माझा देश महत्वाचा आहे. निर्णय घ्यायला ७० वर्ष का लागली? असा सवाल खडसेंनी काँग्रेसला केला आहे.
दरम्यान, कलम ३७० हा देशाचा अखंडतेचा विषय आहे, आज तुम्हाला तिथे घर घेण्याचीही परवानगी नव्हती, माझ्या देशात मला घर घेण्यासाठी अडथळा असणारे हे कलम ३७० काढून देश अखंड आहे हे सिद्ध आहे असं सांगत केंद्र सरकारचं कौतुक केलं.
महाजन, मुंडे यांची उणीव कायम
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असते तर राजकारण वेगळ्या दिशेला असतं. प्रमोद महाजन असते तर देशातील चित्र वेगळं असतं. गोपीनाथ मुंडे यांची उणीव सातत्याने भासत राहील. कुंकविना सुवासिनी तशी नाथाभाऊ शिवाय विधानसभा ही कल्पना करवित नाही असं प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं. विधानसभेची आठवण कायम येईल अशी भावूक प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.