महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:35 AM2019-11-14T05:35:32+5:302019-11-14T05:36:00+5:30

राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे,

Maharashtra Election 2019: 'BJP will try for midterm elections' | महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

Next

अतुल कुलकर्णी 
मुंबई : राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. केंद्रातील भाजप सरकार अडवणुकीची भूमिका घेत आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. सरकार बनवण्याचे कोणतेही पर्याय न शोधता राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेणे हा कुटील डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता, पण बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र जाऊ शकत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सत्तेत जायचे की नाही? कशा पद्धतीने पुढे जायचे? यावर आमचे नेते चर्चा करीत आहेत.
यासाठी किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवर आधी काँग्रेसच्या नेत्यांची आपसात चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. चर्चेअंती आम्ही कोणत्यातरी निष्कर्षाप्रत येऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले.
मंगळवारी मुंबईत अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय चर्चा झाल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही, असेही अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
>समान मुद्द्यांवर अगोदर चर्चा
गेल्या कित्येक वर्षांनंतर माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. पहिलीच भेट असल्यामुळे फार काही व्यापक चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीतून तूर्त कुठलाही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे त्यांंनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना निवडणुकीसाठी एकच जाहीरनामा होता, पण शिवसेनेचा जाहीरनामा वेगळा होता. दोघांच्याही जाहीरमान्यातील समान मुद्दे कोणते असतील यावर आधी आमची चर्चा होईल. त्यानुसार समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर पुढील बोलणी होऊ शकते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: Maharashtra Election 2019: 'BJP will try for midterm elections'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.